Wednesday, October 16, 2024
Homeनगरदारणात मान्सूनचे आगमन, भंडारदरा, मुळा पाणलोटातही हजेरी

दारणात मान्सूनचे आगमन, भंडारदरा, मुळा पाणलोटातही हजेरी

श्रीरामपूर, संगमनेरातही पाऊस || राहाता तालुक्यातही दमदार पाऊस

राहाता तालुक्यातही दमदार पाऊस

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाट माथ्यावर काल खर्‍या अर्थाने मान्सूनचे आगमन झाले. काल धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. राहाता तालुक्यातही काल पावसाचे दमदार आगमन झाले. काल दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता. यातून जोरदार पावसाचे संकेत मिळत होते. काल सायंकाळी 4.30 वाजता दमदार पावसास सुरुवात झाली. हा पाऊस कमी अधिक प्रमाणात टिकून होता. तालुक्यात पावसाचे कमी अधिक प्रमाण राहिले. या पावसाने जमिनीतील ओलावा पेरणीसाठी योग्य होणार असल्याचे शेतकरी सांगतात. या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये मान्सूनचे आगमन झाले. काल पासून पावसाची दमदार हजेरी चालू झाली आहे. सुरुवातीला मान्सूनची जी वाटचाल होती त्यानुसार 15 जूनपर्यंत नियमित मान्सूनचे आगमन अपेक्षित होते. परंतु मान्सूनची गती मंदावल्याने आठवडाभर उशिराने आगमन झाले आहे. जुलै व ऑगस्टमध्ये एल निनो प्रभावहीन होत असून ला निनोचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे जुलै ऑगस्टमध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस होईल. पाण्याचा निचरा न होणार्‍या जमिनीतील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नद्या, ओढे, नाले वाहते होऊन भुजलपातळी मध्ये चांगली वाढ होईल, असे हवामानाचे जाणकार तथा जलसंपदा चे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक उत्तमराव निर्मळ यांनी सांगितले. धरणे, बंधारे शंभर टक्के भरले जातील अशी परिस्थिती राहिल. यावर्षी समन्यायी कायद्यानुसार पाणी सोडण्याची वेळ येणार नाही ही समाधानाची बाब राहील, असे ते म्हणाले. दरम्यान काल पाच ते सहा या एक तासात दारणाच्या भिंतीजवळ 15 मिमी पावसाची नोंद झाली. भावलीला 23 मिमी पावसाची नोंद झाली.

भंडारदरा पाणलोटात पावसाचे प्रमाण वाढले

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि उद्योगास वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात काल पावसाचे प्रमाण काहीसे वाढल्याने पाणलोटात दिलासा मिळाला आहे. काल सकाळी संपलेल्या 12 तासांत धरणात नव्याने 19 दलघफू पाणी दाखल झाले. दुपारनंतरही पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणात ओढे-नाले विसावत आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठा हळुवार वाढत आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात यंदा केवळ 9 टक्के साठा होता. त्यात हळुवार आवक होत असल्याने हा पाणीसाठा काल सायंकाळी 1403 दलघफू पुढे सरकला होता. काल दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद 17 मिमी झाली आहे.

पिंपळगाव खांड धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर

कोतूळ |वार्ताहर| Kotul

नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी, उद्योग आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुळा धरण पाणलोटात काल तासभर जोरदार पाऊस झाल्याने भातरोपांना जीवदान मिळाले आहे. तर 600 दलघफू क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर आहे. मुळा धरण पाणलोट क्षेत्रात आंबित, पाचनई, कुमशेत, हरिश्चंद्रगड परिसरात अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. काल तासभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भातरोपांना जीवदान मिळाले. हा पाऊस झाल्याने मुळा नदीचा प्रवाह आंबित धरणाच्या सांडव्यावरून सुरू आहे. परिणामी मुळा नदीवरील 600 दलघफू क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरणाचा पाणीसाठा काल रविवारी 256 दलघफूपर्यंत पोहचला आहे. पावसाचे प्रमाण टिकल्यास दोन चार दिवसांत या धरणातील पाणीसाठा निम्म्याच्या वर गेलेला असेल.

श्रीरामपूर, संगमनेरातही पाऊस
श्रीरामपूर शहर व परिसरात तसेच संगमनेरातही काल रविवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पेरणी झालेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. कोपरगाव तालुक्यातही हलकासा पाऊस सुरू होता. राहुरी तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाला. नेवासा तालुक्यातील गोणेगाव व इमामपूर येथे शनिवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला,त्यात शेतकर्‍यांच्या कपाशी पिकात पाणीच पाणी झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या