संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील आंबीखालसा येथे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहतांना झालेल्या राजकीय टोमणे आणि वक्तव्यांचे पडसाद कार्यक्रमानंतर उमटले. याच मुद्द्यावरून बोटा गटाचे दोन माजी जिल्हा परिषद सदस्य आमनेसामने येत त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याची घटना शनिवारी (दि. 12) घडली. काही कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून दोघांनाही शांत करत तेथून बाजूला केल्याने संभाव्य मारामारीचा प्रसंग टळला. मात्र, या घटनेची चर्चा दिवसभर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होती.
आंबीखालसा येथे तुळशीनाथ भोर यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम शनिवारी सकाळी पार पडला. धार्मिक विधी झाल्यानंतर महाराजांचे प्रवचन झाले. त्यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहिले. त्यांनी तुळशीनाथ भोर यांच्या कार्याचा व स्वभावाचा उल्लेख करत श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, श्रद्धांजलीच्या भाषणात काही राजकीय संदर्भही देण्यात आल्याची चर्चा आहे. यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांनीही भोर यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या भाषणातही काही राजकीय उदाहरणे आल्याचे सांगण्यात येते. दोन्ही माजी सदस्यांच्या भाषणातून एकमेकांना अप्रत्यक्ष टोमणे मारले गेल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू झाली. त्यामुळे श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपल्यानंतरही उपस्थितांमध्ये याच विषयाची चर्चा होती.
हा कार्यक्रम संपल्यानंतर संबंधित मंडळी गावात परतली. यावेळी जनार्दन आहेर आणि अजय फटांगरे यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद झाला. पाहता पाहता या वादाचे रूप कडाक्याच्या भांडणात झाले. दोघांमध्ये जोरदार वाद सुरू असल्याचे लक्षात येताच उपस्थित कार्यकर्त्यांनी दोन्ही बाजूंना समजावून सांगत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांनाही तेथून बाजूला काढण्यात आले. कार्यकर्त्यांनी वेळीच मध्यस्थी केली नसती, तर वाद अधिक वाढून हाणामारी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि मोठा अनर्थ टळला.
राजकीय संघर्षाला फुटले तोंड…
जनार्दन आहेर आणि अजय फटांगरे हे दोघेही पठारभागातील राजकारणात सक्रिय राहिलेले माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. दोघांमध्ये यापूर्वीपासूनच राजकीय मतभेद व संघर्ष असल्याची चर्चा पठारभागात आहे. त्यामुळे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमातील श्रद्धांजलीच्या निमित्ताने झालेल्या टोमणे-टोमणीनंतर प्रत्यक्ष वाद झाल्याने या जुन्या राजकीय संघर्षाला पुन्हा तोंड फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात श्रद्धांजली वाहताना राजकीय संदर्भ आल्याने त्याचे पडसाद थेट वादात उमटल्याने या घटनेची तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, संबंधित कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वाद अधिक वाढला नाही. त्यामुळे संभाव्य गंभीर प्रकार टळल्याचे बोलले जात आहे.




