मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) आपण एक झटका दिला आहे. आता मुंबई महापालिका निवडणुकीत दुसरा झटका द्यायचा आहे, असा इशारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबईत (Mumbai) उद्धव ठाकरे गटाशी दोन हात करण्यासाठी आपला पक्ष सज्ज असल्याचे जाहीर केले. आपल्याला शिवसेना वाढवायची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक वॉर्डात मतदार यादीतील १२३ नावे सदस्य म्हणून नोंदवायची असून प्रत्येक वॉर्डात १० हजारांहून अधिक सदस्यांची नोंदणी करावी, अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या.
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटावर (Shivsena UBT) मात केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता मुंबई महापालिका निवडणुकीवर (Mumbai Municipal Elections) लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी त्यांनी मंगळवारी वरळीत पक्षाच्या मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने मुंबई आणि राज्यात केलेली कामे जनतेपर्यंत घेऊन जा. प्रत्येक वॉर्डात शिवसेनेच्या शाखा आणि घर तिथे शिवसैनिक झाला पाहिजे, असे लक्ष्य त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. निवडणुका आल्या की मुंबई तोडणार अशी भाषा काहीजण करतात. पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोवर कोणीही मुंबई आपल्यापासून तोडू शकत नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतील सर्व रस्त्यांचे दोन टप्प्यात काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र काही जणांनी मुंबईतील रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली आतापर्यंत ३ हजार ५०० कोटी खाल्ले, असा आरोप शिंदे यांनी लगावला. मुंबईत ३०० एकर जागेवर सेंट्रल पार्क होणार आहे. मात्र काहींना साट्यालोट्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन घेण्याची हिंमत दाखवता आली नाही. मुख्यमंत्री असताना आपण मुंबईचे रस्ते धुतले, प्रदूषण कमी केले. पण तुम्ही मात्र इतकी वर्ष तिजोरीची सफाई केली, अशी घणाघाती टीका शिंदे यांनी केली
देशाला हिंदुत्वाचे विचार देणारे बाळासाहेब ठाकरे एकमेव नेते होते. पण त्यांना खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं. ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. तुम्ही सहकाऱ्यांना नोकर समजायला लागलात. मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही. दिल्लीत राज्य प्रमुखांची बैठक घेतली तेव्हा त्यांनी एका राज्य प्रमुखाला फोन केला आणि म्हणाले, मालकासोबत राहणार की नोकराबरोबर जाणार? मालक आणि नोकर अशी तुलना केल्याने पक्ष कधीच वाढणार नाही, असे शिंदे यांनी ठाकरे गटाला सुनावले. या मेळाव्यात उद्धव ठाकरे गटाचे विलेपार्ले उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे, युवती सेनेच्या अजिता जनावळे, उपविभागप्रमुख अनिल खांडेकर, हनी सबलो, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुंबई सचिव सतीश नायर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला.
महायुतीत कोल्ड वॉर नाही
महायुतीत तीन पक्ष समन्वयाने काम करत आहेत. आमच्या कोणतेही कोल्ड वॉर नाही. तर विकास विरोधी काम करणाऱ्यांच्या विरोधात आमचे युद्ध आहे, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी महायुतीत (Mahayuti) बेबनाव नसल्याची ग्वाही दिली.