Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक नियो मेट्रोला राजकीय ग्रहण

नाशिक नियो मेट्रोला राजकीय ग्रहण

नाशिक । प्रतिनिधी

देशातील पहिला हायस्पीड टायरबेस्ड एलिव्हेटेड नाशिक नियो मेट्रो प्रकल्पाला राज्यातील राजकारण आडवे आले आहे. राज्यात वेगाने विकास होणार्‍या चौथ्या क्रमांकाच्या शहरात नाशिक शहराचा समावेश असून या शहरात पुढील तीस – चाळीस वर्षाची लोकसंख्या लक्षात घेऊन विविध पायाभूत योजना राबविण्यात येत आहेत. याच अंतर्गत एक आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला नाशिक नियो मेट्रो प्रकल्प ही भविष्याची गरज आहे. असे असतांना या अत्याधुनिक प्रकल्पाला राज्यातील राजकारण आडवे आले आहे.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मंजूर केलेल्या या प्रकल्पाला महाविकास आघाडीने रेड सिग्नल दाखविला आहे. शहर विकासाच्या आड राजकारण यायला नको असे सांगणार्‍या राजकीय नेत्यांचा दुटप्पीपणा या प्रकल्पांच्या माध्यमातून समोर आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी 5 ऑक्टोबर 2018 रोजी विभागीय आयुक्तालयातील बैठकीत नाशिकमध्ये मेट्रो चालविण्याची घोषणा केली होती. पुढे नाशिक येथे नियो मेट्रोला राज्य शासनाने नोव्हेबर 2018 ला मंजुरी दिली होती. त्यानंतर शहरात मेट्रोचे सर्वेक्षण करण्याचे काम सिडको आणि महामेट्रो यांनी केले. नाशिकमधील रस्त्यांवर 20 हजारांपेक्षा अधिक प्रवासी संख्या नसल्याने सुरुवातीला या प्रस्तावावर फुली मारण्यात आली. नंतर महामेट्रोने शहरात मेट्रोऐवजी एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो चालविण्याची शिफारस केली आहे.

त्यानुसार टायरबेस मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम दिल्लीच्या राइट्स कंपनीला देण्यात आले. यानुसार प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असून तो केंद्र शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतर यातील त्रुटीच्या पुर्ततेसाठी राज्य शासनाकडे फाईल पाठविण्यात आली आहे. मात्र गेल्या आठ – नऊ महिन्यापासून केंद्राकडून राज्य शासनाकडे आलेली फाईल दाबुन ठेवल्याचा आरोप नुकताच माजी मुख्यमंत्री फडवणीस यांनी नाशिक दौर्‍यात केला. हा प्रकल्प भाजपच्या माध्यमातून मंजूर झाल्याने त्यांस खीळ घालण्याचा प्रकार शिवसेना करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यातून दूरदृष्टी ठेवून साकारणार्‍या नियोजीत नाशिक नियो मेट्रोला ब्रेक लागला आहे.

मागील महायुतीच्या काळात भाजपचे देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्री असल्याने त्यांनी नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेचा सर्व्हे केल्यानंतर नाशिक मध्ये मेट्रो प्रकल्पास मंजुरी दिली आहे. मागील वर्षात राज्यात सत्तात्तर होऊन महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यांनी फडवणीस यांनी मंजूर केलेल्या अनेक योजना बंद केल्या, प्रकल्प थांबविले आहेत. यातच नाशिक नियो मेट्रोचा समावेश असल्याचे आता नाशिककरांच्या समोर आले आहे. राज्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून अनेकदा विकास कामांत राजकारण आड येता कामा नये अशी जोरदार भाषणे ठोकली जातात.

शहरांच्या विकासाला प्राधान्य देतांना विरोधक सत्ताधार्‍यांसमोर राहु असे हाळी पिटली जाते. मात्र राज्यात गेल्या एक वर्षाच्या कालावधीत मागील सरकारचे अनेक प्रकल्प थांबविण्याचे आणि प्रलंबीत ठेवण्याचा सपाटा सुरु आहे. एकीकडे राजकिय मंडळी विकासात राजकारण नको म्हणून सांगतात, दुसरीकडे नाशिकसह इतर शहरातील मागील प्रकल्प थांबविले जातात. यावरुनच राजकिय पक्षांचा दुटप्पीपणा समोर आला आहे. नाशिक शहरातील नियोजीत निओ मेट्रोला हाच दुटप्पीपणा भोवला का ? असा प्रश्न नाशिककर उपस्थित करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या