मुंबई | Mumbai
दिल्ली विधानसभेच्या (Delhi Assembly Election) ७० जागांसाठी बुधवार (दि.५ ) फेब्रुवारी रोजी मतदान (Voting) पार पडले होते. यात ९४.६ लाख मतदारांनी (Voters) मतदान केले होते. या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी कंबर कसली होती. त्यामुळे यंदा दिल्लीत या तिन्ही पक्षांत तिरंगी लढत झाली. त्यानंतर आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला (Counting of Votes) सुरुवात झाली आहे.
सध्याच्या कलांनुसार भाजप (BJP) ७० जागांपैकी ४६ जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्ष २४ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे दिल्लीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असे चित्र दिसत आहे.यादरम्यान आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलतांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रात वाढलेल्या मतांबद्दल देखील मोठे भाष्य केले आहे.
यावेळी राऊत म्हणाले की,”मी कालच दिल्लीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबर जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये स्पष्ट केले होते की , दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न लागू केला आहे. ज्यापद्धतीने महाराष्ट्रात विजय मिळवला आणि त्यासाठी लोकशाहीतील घृणास्पद कृत्य महाराष्ट्रात घडवून आणली, त्याला एक्सपोज राहुल गांधी यांनी केले. लोकसभा आणि विधानसभा यामधील पाच महिन्यांच्या काळात ३९ लाख मते वाढली,असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,”राज्यात जो प्रौढांचा आकडा दिला त्यापेक्षा जास्त मतदान झाले आहे. प्रत्येक मतदारसंघात १५ ते २० हजार मते वाढवली गेली आहेत. यातील काही मते जाणार कुठे तर, ही मते बिहार आणि दिल्लीत वळवली आहेत. १० वर्षांपासून मोदी दिल्लीत होते. मी असताना दिल्ली जिकंली पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे दिल्लीत विजय मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता’, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
तर तासाभरातच भाजपचा पराभव झाला असता…
दिल्ली विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढल्याने या निवडणुकीत इंडिया आघाडीला फटका बसताना दिसत आहे. जर काँग्रेस आणि आपचे मनोमिलन झाले असते तर, आता चित्र वेगळं असते. भाजपला हरवण्यासाठी आप आणि काँग्रेस लढत आहेत. पण ही लढाई ते वेगळे लढत आहेत. वेगळे झाले नसते तर, तासाभरातच भाजपचा पराभव झाला असता, असेही राऊत म्हणाले आहेत.