नवी दिल्ली | New Delhi
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि काही विद्यार्थी संघटनांनी आज (दि.१० ऑक्टोबर) रोजी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र, या आंदोलनाला दिल्ली पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान अशातच आता कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षासह त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) इंदिरा गांधी विमानतळावरून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके (Abhijeet Dipake) आणि त्यांचे सहकारी सौरव दास (Sourav Das) आणि आशुतोष रांका (Ashutosh Ranka) यांना विमानातूनच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना विमानातूनही उतरु दिले नाही.कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन देखील तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके याने “अरे सर मी इथे अरेस्ट होण्यासाठीच आलोय”, असे म्हटले.
अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकारी सकाळी साडे सातच्या सुमारास मुंबईवरून (Mumbai) दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका तिघेही १०.४५ च्या सुमारास दिल्ली विमानतळावर दाखल झाले. मात्र पोलिसांनी विमानात जाऊन दीपके आणि त्यांच्या दोन्ही सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी दीपके यांनी सरकारचा जोरदार निषेध व्यक्त केला. यावेळी दीपके आणि त्यांचे सहकारी येणार म्हणून दिल्ली विमानतळाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे विमानतळाला छावणीचं स्वरूप आले होते. दीपकेंना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना थोड्याच वेळात बाहेर आणले जाणार आहे. त्यानंतर पोलीस त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहेत. मात्र, त्यांना कोणत्या पोलिस स्टेशनला नेणार हे अद्याप समोर आलेले नाही.
कालपासून ५०० जण ताब्यात
दिल्ली पोलिसांनी शुक्रवारपासून कॉकरोच जनता पार्टीच्या ५०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कॉकरोच पार्टीचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मोडीत काढायचे, अशा पद्धतीने दिल्ली पोलीस ही कारवाई करत आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान तैनात आहेत. मागील आंदोलनाचा अनुभव घेत दिल्ली पोलीसांनी यावेळी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
ध्रुव राठी देखील ताब्यात
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याला त्याच्या गुरुग्राममधील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ध्रुव राठीने शुक्रवारी इंडिया गेटवरून एक व्हिडिओ शेअर करत “तुम्ही उद्यासाठी तयार आहात का? मी आलो आहे,” असे म्हटले होते. त्यानंतर आज सकाळी जवळपास ५० पोलीस कर्मचारी साध्या वेशात ध्रुव राठीच्या घरी पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४५ मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले आहेत. याशिवाय दिल्ली आणि निजामुद्दीनला येणार्या मेल आणि एक्सप्रेस ट्रेन देखील रद्द करण्यात आल्या आहेत.




