Friday, May 3, 2024
HomeनाशिकBlog : कोरोना वॉरीयर्स : सुरक्षादूत अर्थात आपले पोलीस मित्र

Blog : कोरोना वॉरीयर्स : सुरक्षादूत अर्थात आपले पोलीस मित्र

संपूर्ण जग सध्या विचित्र अशा संकटाचा सामना करतंय. न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती सर्वत्र आहे. कोणीच या संकटातून वाचलेलं नाही. प्रत्येकालाच आपल्या जिवाची काळजी पडलेली दिसतेय. कुणा अनोळखीच काय पण ओळखीच्या व्यक्तीपासून सुद्धा सर्वसामान्य माणूस चार हात अंतर ठेवून राहतोय. पण अशाही परिस्थितीत काही लोक मात्र देवदूता प्रमाणे अहोरात्र झटत आहेत, केवळ त्यांच्यामुळेच आपण या भयंकर संकटातही काही प्रमाणात निश्चिंतपणे दिवस काढतोय. अशा या सेवादूतांना सलाम करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

आज सकाळीच दोन वेगवेगळे व्हिडीओ पाहिले. एक होता ड्युटीवर असलेल्या दोन महिला पोलिसांचा, दोघी आपापल्या लहानग्यांना सोबत घेऊन काम करीत होत्या. त्यात एकीचे बाळ तर इतके छोटे होते की, तिने अक्षरशः पोलिस स्टेशन मध्येच झोळी बांधली होती, आणि एक हाताने रडणाऱ्या बाळाला ती झोका देत होती तर एका हाताने काम करीत होती. मन हेलावून गेले अगदी हे दृश्य पाहून. आणि दुसऱ्या दृश्यात दिसत होते. दोन पोलीस अधिकारी, लॉक डाउन असलेल्या सुनसान रस्त्यांवर हातात स्पीकर घेऊन मोठ्याने गाणी म्हणून घाबरलेल्या नागरिकांच मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करीत होते.

- Advertisement -

ही दोन्ही दृश्य खरंतर प्रातिनिधिक आहेत. या कोरोनाच्या भयानक काळात आपण सगळे जण एका विचित्र मानसिकतेतून जात आहोत. एकीकडे या आजारामुळे जीवाची भीती, तर दुसरीकडे जीवनावश्यक गरजा तरी कशा पूर्ण होतील याची चिंता. परंतु याही काळात स्वतःचे मनोबल कायम ठेवून दिवसरात्र दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठी झटणारे हे आपके पोलीस मित्र आज आपल्या साठी देवदूता प्रमाणेच भासत आहेत.

एखादा गुन्हा घडला किंवा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालयावरच पोलिसांचे काम असते हा आपला समज या आपल्या मित्रांनी वेळोवेळी खोटा ठरवला आहे. कालच एका पोलीस मित्राशी फोनवरून बोलणं झालं. मुंबईत पोलीस असलेल्या या मित्राने गेल्या कित्येक दिवसापासून आपल्या मुलांची भेट घेतली नाहीये. दुसऱ्याचे रक्षण करता करता स्वतःचे कुटुंब मात्र त्याने पणाला लावले आहे.

आज संपूर्ण भारतात संचारबंदी आहे. पण अनेक नागरिक संचारबंदी तोडून अगदी किरकोळ गोष्टीसाठी बाहेर पडतात. विनाकारण रस्त्यावर फिरतात. नियम तोडतात या सगळ्यांची डोकेदुखी मात्र सोसावी लागते या आपल्या मित्रांना. अगदी कोणी नियम मोडला तरी आपण त्यांनाच बोलणार “पोलीस काय करीत होते? “आणि शिक्षा केली तरी तिकडूनही ओरडणार “पोलिसांना माणुसकी राहिली नाही . ”

विचार करा बाहेर पडणाऱ्या व्यक्तीच्या कपाळावर लिहिलेलं नसतं तो कशासाठी बाहेर पडलाय ते. आणि हे नियम आपल्याच भल्यासाठी आहेत. दुर्दैव अस की आपलाच जीव वाचवण्यासाठी सुद्धा आपण या मित्राचं ऐकत नाहीये. आज संपूर्ण समाज घरात बसून लॉक डाउन गेम्स खेळत असताना हे पोलीस कर्मी मात्र बाहेर आपल्या जीवाची बाजी लावत आहेत.

त्यांचा ड्युटी पिरियड अमर्याद आहे , कधी कधी भरल्या ताटावरून त्यांना उठून जावं लागतंय तर कधी कधी चोवीस चोवीस तास ड्युटी करावी लागते. ड्युटी वरून आल्यावर सुद्धा आपल्या कुटुंबाला भेटताना त्यांना भीती वाटते, की न जाणे बाहेरून आलेल्या आपल्यामुळे आपल्या घरातल्याना काही धोका नको.

अशा परिस्थितीत कधी तरी त्यांच्याही संयमाचा बांध सुटत असेल एखाद्या निरपराधा वर एखादी काठी तुटत असेल, पण आपल्याला मात्र तेवढेच दिसते त्याची मोठी बातमी होते, पण तेव्हा आपण सगळेच विसरतो की पोलीस सुद्धा एक माणूसच आहे. त्यांनी केलेली इतर हजारो चांगली काम आपण सोयीस्कर रित्या विसरून जातो अशावेळी.

असो काही ठिकाणी याच्या विरुद्धही दृश्य आहे, अनेक गावांमध्ये नागरिकांनी संचलन करणाऱ्या या सुरक्षा मित्रांवर पुष्पवृष्टी करून आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर अनेक जण त्यांच्या जेवणखानाची व्यवस्था करतायेत. काही ठिकाणी त्यांच्या निवासासाठी पंचतारांकित हॉटेल्स उघडी करून दिलीय.

समाज म्हणजे सर्व प्रकारच्या वृत्ती असतातच . पण या संकटकाळात मात्र कोणत्याही फायद्याची अपेक्षा न करता लढणाऱ्या या मित्रांना हवेत फक्त प्रेमाचे दोन शब्द. त्यांना लढण्यासाठी आणखी बळ मिळेल.

लहान मुलांना आपण नेहमीच भीती दाखवतो, ” रडू नको नाहीतर पोलीस पकडून नेतात, ” पण मला वाटत यापुढे उगाच अशी अनाठायी भीती मनात भरवणे आपण बंद करूया. त्याऐवजी पोलीस आपले मित्र आहेत हे मनात ठसवूया. आणि या देवदूताना सांगूया,
“या कठीण काळातही आम्ही घरात सुरक्षित आहोत,
ते केवळ तुमच्यामुळेच.
देवाला आम्ही पाहिलं नाही पण सध्यातरी देवासारखे आमचे रक्षण करणारे आमचे खरे देवदूत तुम्हीच आहात, ”
सलाम तुमच्या कर्तृत्वाला !
सलाम तुमच्यातल्या माणुसकीला !!

तनुजा सुरेश मुळे/ मानकर, नाशिक (लेखिका ब्लॉगर आहेत)

- Advertisment -

ताज्या बातम्या