देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara
राज्य सरकारने नुकतेच अहिल्यानगर जिल्ह्यातील नवीन सात स्वतंत्र पोलिस ठाण्यांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये देवळाली प्रवरेचा समावेश करण्यात आला असल्याने सरकारच्या या निर्णयाचे देवळालीकरांनी फटाके फोडून स्वागत केले आहे.
देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे, या मागणीसाठी गेल्या सात ते आठ वर्षांपासून दैनिक सार्वमतच्या माध्यमातून शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनिल कराळे यांनी लढा सुरु ठेवला होता. शेवटी या मागणीला आता यश आले आहे. या मध्ये दैनिक सार्वमतचा सिंहाचा वाटा असल्याचे कराळे यांनी सांगितले. देवळाली प्रवरा हे नगरपरिषदेचे शहर आहे. या शहराची त्यावेळी लोकसंख्या सुमारे बावीस हजाराच्या आसपास होती.
दि. 2 फेब्रुवारी 1983 साली नगरपरिषदेची स्थापना झाली. आणि देवळाली प्रवरा परिसराचा कायापालट होण्यास सुरुवात झाली. नगरपरिषदेची स्थापना होऊन 41 वर्ष झाली आहेत. आता 42 वे वर्ष सुरु आहे. या कालावधीत शहराचा विकास झाला. पण त्यातूलनेत लोकसंख्या देखील मोठ्याप्रमाणात वाढली.आज सुमारे 45 हजार लोकसंख्या झाली असून लोकसंख्या वाढल्याने दिवसेंदिवस गुन्हेगारी मध्ये ही वाढत होत गेली. यावर अंकुश ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलिस ठाणे होणे अत्यंत आवश्यक आहे.
याबाबत दैनिक सार्वमत ने वेळोवळी आवाज उठवण्याचे काम केले. तर श्री.कराळे यांनी स्वतंत्र पोलिस ठाण्यासाठी स्थानिक पातळी पासून राज्यपातळी पर्यंत आत्मदहनासह वेगवेगळी आंदोलन केली. शेवटी या लढ्याला यश आले आहे. यामुळे देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे झाल्यानंतर देवळाली प्रवरासह लगतच्या 24 गावाचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुटणार असल्याने या गावातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करुन कराळे व दैनिक सार्वमतला धन्यवाद दिले आहेत.




