नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi
अलिकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदे यांचे नाव समोर येते. ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून योग्य दिशा देण्याचे काम शिंदे यांनी केले, त्यांनी कधीही पक्षीय अभिनिवेश मनात न ठेवता सर्व पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली. याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चित होईल, असे कौतुकोद्वार नवी दिल्ली होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी आज काढले. पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात पवार बोलत होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
पवार पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री दिले. मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झंझीभाई होते. त्यानंतरच्या काळात यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच नांदवळ गावचे शरद पवार देखील याच यादीत येतात, असे ते म्हणाले. ठाणे, नवी मुंबई, मुंबई या नागरी भाग आहे. ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष सावळाराम पाटील, रांगणेकर यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांचेही आवर्जून नाव घ्यावे लागेल, असे पवार म्हणाले. साताऱ्याचेच कवी सावळाराम पाटील हे ठाण्याचे नगराध्यक्ष होते. पाटील यांना ठाण्याचे नगराध्यक्ष करण्याचा किस्सा पवार यांनी यावेळी सांगितला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या राजकीय संघर्षाचे यावेळी कौतुक केले.
पुरस्कारावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार आहे. या सन्मानापेक्षा यामुळे येणारी जबाबदारीची जाणीव आहे. पवार साहेब सारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे ही गौरवाची बाब आहे. महादजी शिंदे यांचे घराण सातारा जिल्ह्यातील कणेरखेड याच जिल्हात माझा ही जन्म झाला. तसेच माजी क्रिकेटपटू सदु शिंदे यांचे शरद पवार जावई आहेत. पवार साहेबांची राजकारणातील गुगलीही कळत नाही. मात्र आपले पवार साहेबांचे चांगले संबध आहेत, त्यामुळे ते मला गुगली टाकणार नाहीत, असे शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, पानिपतानंतर अवघ्या १० वर्षात महादजी शिंदे यांनी दिल्लीत भगवा फडकवला. महादजी शिंदेंमुळे ब्रिटिशांना भारतात सत्ता काबीज करण्यासाठी तब्बल ५० वर्ष वाट पहावी लागली. महादजी शिंदे नसते तर ब्रिटीशांनी १५० नव्हे तर २०० वर्ष गुलामी सहन करावी लागली असती. त्यामुळेच ब्रिटीशांनी त्यांना ग्रेट मराठा ही पदवी बहाल केली होती, असे महापराक्रमी महादजी शिंदे होते, असे ते म्हणाले. रणांगणात कामिगिरी फत्ते करणाऱ्या मावळ्यांना सोन्याचे सलकडं देण्याची इतिहासात प्रथा होती, माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे सोन्याचे सलकडं आहे अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. माझ्या मराठी मातीने केलेले कौतुक आहे. माझ्यासोबत अहोरात्र कष्ट करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचा, लाडक्या बहिणींचा आणि लाडक्या भावांचा हा सन्मान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आपल्या पाठी पहाडासारखे उभे राहिले म्हणून महाराष्ट्रात अडीच वर्षात सरकारने प्रचंड काम केले. महादजी शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यात येईल, तसेच कणेरखेड येथे महादजी शिंदे यांच्या राष्ट्रीय स्मारकाबाबत राज्य सरकार विचार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
दरम्यान या सन्मान सोहळ्यात दिल्लीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध बृहन्महाराष्ट्र मंडळांचे प्रतिनिधी यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.