सपुष्प वनस्पती पृथ्वीवर नेमक्या कोणत्या ठिकाणी, कधी आणि कुणापासून आल्या हे एक न उलगडलेले कोडे असले, तरी सपुष्प वनस्पती ह्या साधारणतः १३ कोटी वर्षांपासून पर्यावरणात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे मत अनेक शास्त्रज्ञांनी पुराव्यासह मांडले आहे. या दृष्टीने सह्याद्री पर्वतरांगांतील पुष्पवैभव वाखाणण्याजोगे आहे. गरज आहे ती केवळ या समृद्धीचे संवर्धन करण्याची आणि या जैवविविधतेकडे बघण्याचा मानवी दृष्टिकोन बदलण्याची..!
चार्ल्स डार्विनच्या मते सपुष्प वनस्पतींचा उदय नेमका कुठे झाला हे एक गूढ आणि अनाकलनीय कोडे आहे. जगात सपुष्प वनस्पतींच्या ३ लाखांहून अधिक प्रजाती सापडतात. सपुष्प वनस्पती पृथ्वीवर नेमक्या कोणत्या ठिकाणी, कधी आणि कुणापासून आल्या हे एक न उलगडलेले कोडे आहे. तरीसुद्धा शास्त्रज्ञांनी याविषयी काही अंदाज बांधले आणि साधारणतः १३ कोटी वर्षांपूर्वी सपुष्प वनस्पती या उष्णकटिबंधीय वर्षा वनांमध्ये अनावृत्त बीजी किंवा बिया असणार्या नेचेवर्गीय वनस्पतीपासून आल्या असाव्यात असे काही पुराव्यानिशी आपले म्हणणे मांडले. या वनस्पती पर्यावरणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात, अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन प्रदान करतात. तसेच शेती, बागकाम आणि औषधांमध्ये मानवजीवनास महत्त्वपूर्ण योगदान देतात.
सपुष्प वनस्पतींची वैशिष्ट्ये
सपुष्प वनस्पतींमध्ये प्रजननासाठी महत्त्वपूर्ण संरचना असलेली फुले असतात. या फुलांमध्ये पुरुष आणि स्त्री अवयव असतात, ज्यामुळे परागीभवन आणि फलन शक्य होते. फलन प्रक्रियेनंतर तयार झालेले बीज फळांमध्ये संरक्षित केले जातात. हे सपुष्प वनस्पती किंवा आवृत्तबीजी वनस्पतींचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यामुळे बीजांचे संरक्षण होते आणि त्यांचे विखुरले जाणे अधिक सोपे होते. फुलणार्या वनस्पतींचे पर्यावरणात महत्त्वपूर्ण कार्य असते.
अन्न उत्पादन : सपुष्प वनस्पती बहुतेक अन्न साखळ्यांचा आधार आहेत. प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात.
परागीभवन : अनेक फुलणार्या वनस्पतींना परागीभवनासाठी कीटक, जसे की मधमाशी आणि फुलपाखरे यांच्यावर अवलंबून राहावे लागते. या परस्पर संबंधामुळे वनस्पतींची प्रजनन क्षमता वाढते.
निवारा आणि आश्रय : फुलणार्या वनस्पती अनेक प्राण्यांसाठी निवारा आणि आश्रय प्रदान करतात, ज्यामुळे जैवविविधता टिकून राहते.
मातीचे आरोग्य : सपुष्प वनस्पतींच्या मळ्या माती संधारणामध्ये मदत करतात. मातीची रचना सुधारतात आणि पोषक तत्त्वांच्या चक्रात योगदान देतात.
सौंदर्यात्मक मूल्य : बागकाम आणि लँडस्केपिंगमध्ये फुलणार्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात, ज्यामुळे वातावरणाचे सौंदर्य वाढते.
संस्कृतीतील महत्त्व : अनेक संस्कृतींमध्ये फुलणार्या वनस्पतींचा उत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये सुंदरता, प्रेम आणि नवजीवनाचे प्रतीक मानले जाते.
सपुष्प वनस्पतींची विविधता
जगात साधारणतः सपुष्प वनस्पतींच्या तीन लाख प्रजाती आढळतात. त्यापैकी ५५ ते ६० हजार प्रजाती एकट्या ब्राझील देशात आढळतात. एवढ्या प्रमाणात प्रजाती आढळण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथे असलेली परिस्थिती किंवा त्यामधील विविधता. यामध्ये प्रामुख्याने अॅमेझॉन वर्षा वने, अटलांटिक जंगले आणि सवाना गवताळ प्रदेशाचा समावेश होतो. भारताची सपुष्प वनस्पतींची विविधता सुद्धा काही कमी नाही. भारतात सपुष्प वनस्पतींच्या २२ हजार २१४ प्रजाती आढळतात. भारतामध्ये एवढ्या प्रजाती आढळण्याचे कारण सुद्धा अधिवासांची (Habitate) असलेली विविधता हेच आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे हिमालय, समुद्र, वाळवंट, सह्याद्री पर्वतरांगा, सातपुडा पर्वतरांग, अरवली पर्वतरांग, नद्या, सरोवरे, पठारे, गवताळ प्रदेश इत्यादी अधिवास आढळतात. सह्याद्रीमध्ये साधारणत: सपुष्प वनस्पतींच्या ७ हजारहून जास्त प्रजाती आढळतात. त्यापैकी दीड हजार प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. प्रदेशनिष्ठ म्हणजे एखादी प्रजाती फक्त विशिष्ट ठिकाणी सापडत असेल आणि जगात इतरत्र कुठेच सापडत नसेल, तर त्याला प्रदेशनिष्ठ वनस्पती असे म्हणतात.
खरपुडी किंवा कंदील फुलांच्या महाराष्ट्रात २५ प्रजाती आढळतात, जवळपास २००० वनस्पतींची माहिती दिली आहे. या पुस्तकात सह्याद्रीच्या उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या ब्रिटिशकालीन मुंबई प्रांतातील सपुष्प वनस्पतीची माहिती आढळते. हे पुस्तक आज सुद्धा बर्याच शास्त्रज्ञांकडून वापरले जाते. तदनंतर सह्याद्रीतील सपोर्ट वनस्पतींची नोंद करण्याचे काम अनेक शास्त्रज्ञांकडून झाले. ज्यामध्ये अलीकडच्या काळातील व्ही. डी. वर्तक, भारतीय वनस्पती सर्वेक्षण या संस्थेचे शास्त्रज्ञ, तसेच शिवाजी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक आणि सध्या भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे मानद शास्त्रज्ञ प्राध्यापक एस. आर. यादव आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी सपुष्प वनस्पतींच्या ऐंशीहून अधिक प्रजाती शोधल्या आहेत.
सह्याद्रीमधील जंगलांचे प्रकार उष्णकटिबंधीय ओलसर वने, उष्णकटिबंधीय कोरडी वने, उपोष्ण-कटिबंधीय वने, अर्ध-सदाहरित वने इत्यादी. या वनांमध्ये वेगवेगळ्या सपुष्प वनस्पती आढळतात. सह्याद्रीमध्ये गवतांच्या साधारणतः २०० हून अधिक प्रजाती आढळतात.

त्यापैकी ग्लायफोकलोवा महाराष्ट्रीएंसिस ही फक्त महाराष्ट्रामध्ये आढळते.
सह्याद्रीतील पठारे
सह्याद्रीमध्ये कास पठारांसारखी जांभ्या खडकांची अनेक पठारे आहेत. या पठारावर अनेक प्रजाती आढळतात. सातार्याजवळ असलेल्या कास पठारावर साडेतीनशेहून अधिक प्रजाती आढळतात. सप्टेंबर महिन्यात कास पठारावर गेले असता अनेक प्रजातींची फुले एकाच वेळी उमललेली दिसतात. त्यामुळे ती एक फुलांची काढलेली मोठी रांगोळी भासते. कास पठारासारखे; परंतु बेसाल्ट खडकाने बनलेले नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरजवळ अंजनेरी हे सुद्धा एक पठार आहे. ज्यावर ३८५ हून अधिक सपुष्प वनस्पतींची नोंद केलेली आहे. या पठारावर सापडणारे सिरोपेजिया अंजनेरीका हे कंदीलफुल अंजनेरी पर्वत सोडून जगात इतरत्र कुठेच आढळत नाही.
सह्याद्रीतील औषधी वनस्पती सह्याद्रीमध्ये अनेक औषधी वनस्पती आढळतात. त्या औषधी वनस्पतींचा उपयोग करून अनेक रुग्णांना बरे करणारे, अनेक वैदु सह्याद्रीच्या दुर्गम पाड्यांवर राहून आपली सेवा देतात. त्र्यंबक आणि मोखाडा यामध्ये असणार्या वाल नदीच्या काठावरील चिंचुतारा या गावात परशुराम निरगुडे नावाचे एक वैदु काविळीचे औषध विनामूल्य देतात आणि आजवर हजारो रुग्णांना त्यांनी बरे केले आहे.
सपुष्प वनस्पतींच्या अभ्यासातील काही अडचणी
१) अपुरे मनुष्यबळ : ज्यांना सजीव शास्त्रीय पद्धतीने ओळखता येतात असे मनुष्यबळ अत्यंत तुटपुंजे आहे. भारतात सध्या सजीवांचे वर्गीकरण करणार्या शाखेला टाकाऊ समजले जाते आणि इतर शास्त्रज्ञांसारखे या विषयांमध्ये काम करणार्या शास्त्रज्ञाला वलय नसते. त्यामुळे एकूणच वर्गीकरण शास्त्राचा आणि पर्यायाने सपुष्प वनस्पतींचा अभ्यास करण्याची अनास्था दिसून येते.
२) झपाट्याने र्हास होत असलेले अधिवास : या कारणामुळे काही सजीव हे माहीत होण्याआधीच नष्ट होत आहेत. पृथ्वीवरून कायमस्वरूपी नष्ट होणार्या सजीवांची संख्याही झपाट्याने वाढत आहे म्हणजे सपुष्प वनस्पतींच्या अभ्यासाला दोन्ही बाजूंनी अडचण आहे, ती म्हणजे माहिती करून घेणारे अपुरे मनुष्यबळ आणि माहीत होण्याच्या आधीच सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती.
सपुष्प वनस्पती नष्ट होण्याची काही कारणे
१) मानवाचा हव्यास, २) झपाट्याने वाढणारी लोकसंख्या
पृथ्वीवरील मानवाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनावर त्याचा ताण वाढतो. पर्यायाने औद्योगिकीकरण, शहरीकरण होते आणि पर्यायाने चंगळवाद फोफावतो. एकाच व्यक्तीचा अनेक घरे घेण्याकडे कल वाढू लागला आहे. शहरात राहणारी उच्चभ्रू माणसे जंगलामध्ये घरे बांधून तिथे सुट्टीच्या दिवशी राहण्यासाठी येत असतात. यामुळे जंगलाची बेसुमार तोड झाली. वाढत्या लोकसंख्येमुळे शेतजमीन विकसित करण्याची गरज भासल्यामुळे सुद्धा जंगलावर संक्रांत ओढवली.
अशास्त्रीय धोरणे
जैवविविधतेच्या संवर्धनासाठी शासन काही धोरणे ठरवत असताना शास्त्रीय दृष्टिकोन ठेवत नाही आणि बेसुमार वृक्ष लागवड करण्यावर भर देते. त्यापैकी बरीचशी झाडे जगत नाहीत. त्यामुळे वृक्ष लागवडीचे अत्यंंत सूक्ष्म नियोजन करून त्यांची लागवड केली पाहिजे. बर्याचदा वृक्ष लागवड करताना शास्त्रीय दृष्टिकोन न बाळगल्याने, दिसले मोकळे रान की तिथे वृक्ष लागवड करण्याची एक जीवघेणी स्पर्धा दिसून येते. तसेच, गड आणि किल्ले येथे सुद्धा अज्ञानातून आणि अतिउत्साहाच्या भरात वृक्षारोपण केले जाते. खरेतर नैसर्गिक अधिवासांमध्ये अशी बाहेरून नेऊन झाडे लावणे अत्यंत अशास्त्रीय आहे. असा हस्तक्षेप केल्याने तेथील परिसंस्थेमध्ये अतिशय वाईट बदल घडून येतात. खरे तर मोकळे रान किंवा गवताळ प्रदेश हा दिसायला जरी वृक्ष विरहित दिसत असला, तरी त्याचे पर्यावरणीय महत्त्व हे जंगलाइतकेच किंवा त्याहून अधिक आहे.
गवताळ प्रदेशामध्ये होणार्या अशास्त्रीय वृक्षारोपणामुळे येणार्या काळात अनेक पर्यावरणीय अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागेल. या अडचणींची सुरुवात सुद्धा झाली आहे. बिबट्याचे मानवी वस्तीत घुसणे, लहान बालके आणि गुरेढोरे यांच्यावरील वाढते हल्ले, गवा,रेडा या प्राण्यांचे अगदी पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात येणे, हरणांच्या आणि हत्तींच्या कळपांनी शेतीमध्ये धुडगूस घालणे ही जंगलातील तसेच गावाबाहेरील गवताळ कुरणे नष्ट झाल्याचा/केल्याचे परिणाम आहेत. गेल्या काही महिन्यांत नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात १० हून अधिक बालके मृत्युमुखी पडली आहेत.
ज्या निष्पाप बालकांचे जीव गेले त्यांनी जग अजून नीट पाहिलेही नव्हते. गेल्या काही पिढ्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा त्या निष्पाप बालकांना मिळाली. त्यामुळे जर गवत वाचले, तरच तृणभक्षी प्राणी वाचतील आणि ते वाचले तर मांसाहारी मोठी श्वापदे मानवी वस्त्यांमध्ये येणार नाहीत, हे साधे समीकरण बिघडवण्यामधील अनेक कारणांपैकी एक म्हणजे अशास्त्रीय वृक्षारोपण आणि पर्यायाने निसर्ग वाचविण्यातील अशास्त्रीय धोरणे. खरे तर निसर्ग वाचविण्याएवढे आपण निश्चितच मोठे नाही. निसर्ग स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहे. आपला वाढता हस्तक्षेप उलट निसर्गाचा र्हास करण्यामध्ये किंवा त्या र्हासाची गती वाढवण्यास हातभार लावत आहे. याचा अर्थ आपण काहीच करू नये असा नाही. काही उपाययोजना जरूर कराव्या लागतील
त्यापैकी काही उपाययोजना खालीलप्रमाणे-
१) लोक जैवविविधता नोंदवही किंवा सार्वजनिक जैवविविधता नोंदवही : प्रत्येक गावाने आपल्या जैवविविधतेची शास्त्रीय नोंद ठेवणे अत्यावश्यक आहे. २) अधिवासातील केलेले संवर्धन : जंगल वाचावे असे वाटत असेल तर त्यामध्ये आपला हस्तक्षेप अजिबात करू नये. झाड जेथे आहे तिथेच त्याचे संवर्धन करणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. याला ‘अधिवासातील केलेले संवर्धन’असे म्हणतात. संवर्धनाचा हा प्रकार अत्यंत चांगला असून वनस्पतींचे किंवा प्राण्यांचे संवर्धन हे त्याच्या त्याच्या अधिवासामध्येच करायला हवे याचे उदाहरण म्हणजे भारतात आणि जगभरात असलेली अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प, संवर्धित जंगले, बायोस्पियर रिझर्व, राष्ट्रीय उद्याने इत्यादी. उदा. राधानगरी-दाजीपूर अभयारण्य (कोल्हापूर), कोयना अभयारण्य (सातारा), चांदोली राष्ट्रीय उद्यान (सांगली), सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, निलगिरी बायोस्पिअर रिझर्व ई. ३)अधिवासाबाहेरील संवर्धन (एक्स-सिटू कॉन्झरवेशन) : जंगलाबाहेर किंवा त्याच्या अधिवासाबाहेर संजीवांचे संवर्धन केल्यास त्याला अधिवासाबाहेरील संवर्धन (एक्स-सिटू कॉन्झरवेशन) असे म्हणतात. उदा. वनस्पती उद्याने, प्राणी संग्रहालय, जनुक साठवणूक केंद्रे, बियाणे संवर्धन केंद्रे इत्यादी. ४) जैवविविधता कायदा २००२ अत्यंत कडक करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे. ५) अभ्यासाशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी नैसर्गिक अधिवासात फिरण्यास मज्जाव करणे. ६) गावागावात जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जनजागृती कार्यशाळा घेणे. ७) निसर्गावर केलेल्या संशोधनाचे स्थानिक भाषेत भाषांतर करून तेथील लोकांना त्या नाजूक अन्नसाखळीचे महत्त्व पटवून देणे.
संत तुकाराम महाराज यांनी जैवविविधतेचे महत्त्व त्यांच्या गाथेमध्ये समजावून सांगितले आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती’ या अभंगांमध्ये वृक्षवल्ली म्हणजेच वृक्ष, वेली, प्राणी, पशु-पक्षी हे आपल्याला मित्रांसारखे आहेत असे सांगितले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आज्ञापत्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जंगलातील लाकूड तोडू नये असे सांगितले आहे. अगदी वाळलेले लाकूडसुद्धा त्याच्या मालकास योग्य मोबदला देऊन मगच तोडून न्यावे, असा आदेश दिला आहे. हे सर्व असताना सुद्धा स्वयंशिस्तीच्या अभावामुळे आणि भूतदयेचा विसर पडल्यामुळे दिवसेंदिवस जैवविविधतेचा र्हास होत आहे. येणार्या काळामध्ये काही सरकारी धोरणे बदलल्यास आणि जैवविविधतेबाबतचे कायदे कडक केल्यास सपुष्प वनस्पतींची विविधता वाचवण्यास मदत होईल आणि हा अनमोल ठेवा पुढच्या पिढीस देता येईल.
डॉ. शरद सुरेश कांबळे- सहाय्यक प्राध्यापक आणि वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा