Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबाररुग्णवाहिका सुविधेसाठी प्रशासनाची सुलभ प्रणाली विकसीत

रुग्णवाहिका सुविधेसाठी प्रशासनाची सुलभ प्रणाली विकसीत

नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील रुग्णवाहिकांची स्थिती दर्शविणारी नवी ऑनलाईन प्रणाली विकसीत केली आहे. नागरिकांना आपल्या घर किंवा गावाजवळील रुग्णवाहिकेची स्थिती त्यामुळे लक्षात येणार असून त्यानुसार तात्काळ सेवा उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

जिल्हा शासनाच्या https://nandurbar.gov.in/covid-19-updates/ किंवा www.ndbcovidinfo.com या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घराजवळील रुग्णवाहिकेची स्थिती लक्षात येऊ शकेल. अशा रुग्णवाहिकेवर क्लिक केल्यास रुग्णवाहिका क्रमांक, वाहन चालकाचे नाव व मोबाईल क्रमांक दर्शविला जाईल. वाहन चालकाशी थेट संपर्क करून रुग्णवाहिकेची सुविधा घेता येईल.

संकेतस्थळावर रुग्णवाहिकेचा शोध घेतांना रुग्णवाहिका क्रमांक किंवा परिसराचा पर्यायही निवडण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.रुग्णवाहिकेसाठी १०२, १०८, किंवा नियंत्रण कक्षातील ०२५६४-२१०१२३,२१०२३४,२१०३४५,२१०००६ या क्रमांकावरदेखील रुग्णवाहिकेसाठी संपर्क करता येईल.

या सर्व रुग्णवाहिकांचे केवळ कोविड-१९, सर्व रुग्णांसाठी, गरोदर माता व शिशू आणि शववाहिका अशा चार प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. संबंधित रुग्णवाहिका त्याच कामासाठी उपयोगात आणली जाणार असून लवकरच त्यानुसार शोधण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धर्मेंद्र जैन यांनी सांगितले.यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी रुग्णवाहिकांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे.

जिल्हा सूचना विज्ञान केंद्र आणि जिल्हा नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून कोविड संकट काळात नागरिकांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रुग्णवाहिकांचे ट्रॅकींग करण्यात येत आहे. जिल्ह्यात नव्याने दाखल झालेल्या रुग्णवाहिकांना त्वरीत या प्रणालीशी जोडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या