Monday, February 23, 2026
HomeराजकीयDevendra Fadnavis : मी जेव्हा विरोधी पक्षनेता होतो, तेव्हा…; अजितदादांबाबत भाषण करताना...

Devendra Fadnavis : मी जेव्हा विरोधी पक्षनेता होतो, तेव्हा…; अजितदादांबाबत भाषण करताना मुख्यमंत्री भावूक

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, २३ फेब्रुवारी रोजी शोकपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार होते, मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण सभागृहावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अजित पवारांच्या कार्यपद्धतीचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, “अजित दादा म्हणजे स्पष्टवक्तेपणाचे दुसरे नाव होते. त्यांना एखादा निर्णय पटला नाही तर ते तोंडावर स्पष्ट सांगायचे. मंत्रिमंडळातील प्रत्येक विषयाचा त्यांचा अभ्यास दांडगा असायचा. राज्याने दादांच्या रूपात एक असा नेता गमावला आहे, ज्यांच्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची पूर्ण क्षमता होती. दुर्दैवाने, अजित दादांनी पहिल्यांदाच टायमिंग चुकवला.”

YouTube video player

फडणवीस यांनी दादांच्या शिस्तीचे आणि वक्तशीरपणाचे अनेक किस्से सांगितले. “मी जेव्हा विरोधी पक्षनेता होतो, तेव्हा दादा गमतीने मला मुख्यमंत्री म्हणून संबोधायचे. कार्यक्रमाची वेळ १२ वाजताची असेल, तर दादा ११ वाजून ५९ मिनिटांनी तिथे हजर असायचे. त्यांची ही शिस्त प्रशासनासाठी नेहमीच आदर्श राहिली आहे. महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने एक उत्तम मुख्यमंत्री मिळाला असता आणि मला विश्वास आहे की नियतीने त्यांचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण केले असते, परंतु काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले,” असे मुख्यमंत्री भावूक होत म्हणाले.

राजकीय वाटचालीवर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांची तुलना दिग्गज नेत्यांशी केली. त्यांनी नमूद केले की, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक ‘दादा’ होऊन गेले, पण वसंतदादा पाटील आणि अजितदादा पवार ही दोन नावे त्यांच्या अलौकिक कामामुळे महाराष्ट्र सदैव लक्षात ठेवेल. “बारामतीचा अपराजित नेता” अशी त्यांची ओळख केवळ राजकारणामुळे नव्हती, तर जनतेने त्यांच्यावर केलेल्या अतोनात प्रेमामुळे होती, असेही त्यांनी नमूद केले.

अजित पवारांच्या सुरुवातीच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, सुरुवातीला ते थोडे अबोल होते. मात्र, सुधारराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात काम करताना त्यांच्या कामाचा झपाटा पाहून खुद्द सुधाकरराव नाईकही थक्क व्हायचे. एका मोठ्या राजकीय घराण्यातील वारसा असूनही त्यांनी स्वतःच्या कष्टाने आणि कामाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. अजित दादांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत क्लेशदायक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

रोहित

Rohit Pawar: तर मराठी माणूस काय ते दाखवून देऊ; अजितदादांच्या अपघाताप्रकरणी...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. दरम्यान त्यांच्या मृत्यूनंतर आता हा अपघात होता की घातपात याबाबतचे प्रश्न...