Wednesday, June 10, 2026
Homeदेश विदेशBus Accident : भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, १८ जणांचा...

Bus Accident : भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, १८ जणांचा मृत्यू

काठमांडू । Kathmandu

नेपाळमध्ये सोमवारी पहाटे एक अत्यंत भीषण रस्ते अपघात झाला असून, प्रवाशांनी भरलेली बस त्रिशुली नदीत कोसळल्याने १८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. धाडिंग जिल्ह्यातील गजुरीजवळ हा अपघात घडला. या दुर्घटनेत २६ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये काही परदेशी पर्यटकांचाही समावेश असल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आज २३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ४४ प्रवाशांना घेऊन ही बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने निघाली होती. पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास काठमांडूपासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या पृथ्वी महामार्गावरील बेनीघाट रोरांग येथे बस पोहोचली. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल त्रिशुली नदीत कोसळली.

या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून यामध्ये ६ महिला आणि १२ पुरुषांचा समावेश आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण ४४ प्रवासी प्रवास करत होते. प्रशासनाने तातडीने मदतकार्य राबवून २६ जखमी प्रवाशांना वाचवण्यात यश मिळवले आहे. जखमींमध्ये ७ महिला, १८ पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. या सर्व जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नदीपात्रातून जखमींना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने बोटींचा वापर केला. जखमींना बोटीने सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत नेऊन, तिथून रुग्णवाहिकेच्या साहाय्याने रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आले. रात्रीची वेळ, डोंगरदऱ्यांचा कठीण भूभाग आणि अपुऱ्या साधनसामग्रीमुळे सुरुवातीला मदतकार्यात अनेक अडथळे निर्माण झाले होते. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरीत्या मोठी बचाव मोहीम राबवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही घटनास्थळी शोध मोहीम सुरू असून नदीपात्रात अन्य कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. परदेशी पर्यटकांच्या मृत्यूमुळे नेपाळमधील पर्यटन वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे. पृथ्वी महामार्गावरील धोकादायक वळणे आणि चालकाचा ताबा सुटणे हे या अपघाताचे प्राथमिक कारण मानले जात असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

पुरुषोत्तम

पुरुषोत्तम पुरीत येथे मोठी दुर्घटना टळली! ३५ भाविकांना घेऊन जाणारी बोट...

0
बीड | Beedबीडच्या माजलगाव तालुक्यातील प्रसिद्ध पुरुषोत्तमपुरी येथून मोठी बातमी समोर येत आहे. भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीच्या पात्रात पलटल्याची धक्कादायक घटना घडली...