मुंबई | Mumbai
सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरण तब्बल पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे. शिवाय त्यांनी आदित्य ठाकरेंचाही उल्लेख केल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळात सत्ताधारी व विरोधकांमध्ये विधिमंडळाच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी खडाजंगी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
दिशा सालियन प्रकरणात वकील निलेश ओझा यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत मोठी मागणी केली आहे. आदित्य ठाकरे, डिनो मारियो हे दोन ते तीन तास दिशा सालियानच्या फ्लॅटवर होते. अशा काही सिक्रेट बाबी समोर आल्या आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरे यांना तात्काळ अटक होऊ शकते, अटक झाली पाहिजे. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर यांच्याविरोधात सामूहिक बलात्कार, हत्या अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत. कस्टडी घेण्यात यावी. यांची लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी. आरोपीला मृत्यूदंड होईल, हे सुनिश्चित करावे ही आमची प्रमुख मागणी आहे, असे ओझा यांनी म्हटले होते.
दिशा सालियनच्या वडिलांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गंभीर आरोप केले आहेत. १४व्या मजल्यावरून पडूनही दिशाच्या शरीरावर एकही जखम कशी झाली नाही? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या आधारावर दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांची भुमिका काय?
देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये यावर भाष्ट केले आहे. “ही सगळी चर्चा कोर्टाच्या केसमुळे सुरू झाली. उच्च न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनीही एक मुलाखत दिली आहे. शासनाची भूमिका यासंदर्भात पक्की आहे. न्यायालय काय म्हणतेय? न्यायालयात ते काय पुरावे देत आहेत? यावर पुढची भूमिका ठरेल”, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
आत्तातरी शासनाच्या किंवा पोलिसांच्या पातळीवर हा विषय नाही. न्यायालय ज्या प्रकारे आम्हाला आदेश देईल किंवा न्यायालयात जर काही नवीन पुरावे, गोष्टी आल्या तर त्या आधारावर त्या वेळी सरकार निर्णय घेईल. आत्तातरी आम्ही न्यायालयाकडे नजर ठेवून आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा