Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis: "लोकांमध्ये द्वेष तयार करायचा, एवढे एकमेव ध्येय"…; राहुल गांधींच्या आरोपांवर...

Devendra Fadnavis: “लोकांमध्ये द्वेष तयार करायचा, एवढे एकमेव ध्येय”…; राहुल गांधींच्या आरोपांवर फडणवीसांचे प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांची आज भेट घेतली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. दलित असल्याने पोलिसांनी सोमनाथची हत्या केली असून, मुख्यमंत्री विधानसभेत खोटे बोलले, असा राहुल गांधी यांनी आरोप केला आहे. या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले असून राहुल गांधी हे मागील काही वर्षांपासून द्वेष पसरवण्याचे काम करत असून, त्यासाठीच ते परभणीला आले होते, असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना म्हंटले, राहुल गांधी यांची ही राजकीय भेट होती. मागील काही वर्षांपासून ते द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. त्यासाठीच ते परभणीत आले होते. लोकांमध्ये, जातीजातींमध्ये द्वेष तयार करायचा, एवढे एकमेव ध्येय त्यांचे आहे. तेच काम गेली अनेक वर्ष ते सातत्याने करताहेत. त्यामुळे मला असे वाटतेय की, हे जे काही विद्वेषाचे त्यांचे जे काम आहे, त्याठिकाणी जाऊन पूर्ण केले आहे”, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या दौऱ्यावर केली.

- Advertisement -

या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा आम्ही केली आहे. त्यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. न्यायालयीन चौकशीत यासंदर्भातील सगळे सत्य आणि तथ्य बाहेर येईल. काहीही लपवण्याचे कारण नाहीये. आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारामध्ये मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय, असे बाहेर आले, तर कुणालाही सोडले जाणार नाही. कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई केली जाईल”, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

राहुल गांधींचा आरोप काय आहे?
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दल सभागृहात खोटी माहिती दिली असा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे. ते दलित असल्यामुळे त्यांची पोलिस कोठडीत हत्या करण्यात आली. यामागे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची विचारधारा आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की, मी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिला आहे. त्यावरुन स्पष्ट दिसत आहे की, सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली.

राहुल गांधी राजकारणासाठी आले-शिरसाट
राहुल गांधी परभणी दौऱ्यावर आले असता त्यांनी सुर्यवंशी कुटूंबाची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. दुसरीकडे शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी राहुल यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी हे राजकारण करण्यासाठी आले आहेत. कोण गेले,कोण राहिले? यापेक्षा त्यांना घटनेचे पुस्तक घेऊन फिरायचे आहे. आम्ही घटना मानणारे आहोत, असे त्यांना दाखवायचे आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या