मुंबई | Mumbai
उबाठा पक्षाचे आमदार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानिमित्त विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची, नेत्यांची भाषणे झाली. यावेळी, सभागृहात ठाकरे आणि शिंदे गटात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध टोलेबाजीही केल्याचे दिसून आले. तत्पूर्वी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना थेट ऑफरच देऊ केली. त्यानंतर, सभागृहात चांगलाच हशा पिकला. मात्र, हे सभागृहातील खेळीमेळीचे वातावरण असल्याचे ठाकरे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ही भेट विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयात झाली. त्यांची ही भेट सुमारे २० मिनिटे चालली.
फडणवीस यांनी काल सरकारमध्ये येणार असल्याची ऑफर दिलेली असताना उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी गेले. मुख्यमंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्ये जवळपास अर्धा तास ही भेट घडली. या भेटीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी इतर काही आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांना “हिंदी सक्ती हवी कशाला?” हे राज्यभरातील विविध संपादकांनी लिहिलेल्या लेखांचे संकलित पुस्तक दिले. यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार वरुण सरदेसाई, आमदार सचिन आहिर, आमदार सुनील राऊत आणि मान्यवर उपस्थित होते.
विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त आहे. विधानसभेतील विरोधी बाकांवरील पक्षांचा विचार केल्यास ठाकरेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे २० आमदार आहे. पण अद्याप त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालेले नाही. त्यासंदर्भात नेत्यांमध्ये चर्चा झाली. विधानसभा विरोधी पक्षनेतेपद हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. मग ते का दिले जात नाही याबद्दल ठाकरेंनी मुख्यमंत्री यांच्यासोबत अँटी चेंबरमध्ये चर्चा केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार देखील उपस्थित होते.
दरम्यान, अंबादास दानवे यांची आमदारकी ऑगस्ट महिन्यात संपत आहे. मात्र, पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पुढील अधिवेशनासाठी कोणीही विरोधी पक्षनेते राहणार नाही. त्यामुळे, अगोदरच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्याची मागणी केली आहे. आता, विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




