शिर्डी | प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची खळबळजनक घटना घडली.
मंत्रालयात सुरक्षाव्यवस्था असतानाही महिला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयापर्यंत कशी पोहोचली? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून आता यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
आपली बहिण चिडली असेल, तिची व्यथा असेल तर आपण समजून घेऊ, कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल, तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्यामागे वेगळं असेल तर ते देखील समजून घेऊ, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आपल्या मंत्रालयात आपण सर्वांना एन्ट्री देतो, कोणतीही अडवणूक आपल्या मंत्रालयात नाहीए. अशा परिस्थितीत कधी लोकं पहिल्या मजल्यावरुन जाळीवर उडी मारतात, कधी लोकं रोष प्रकट करतात याचा अर्थ ते आपले विरोधक आहेत, असं नाहीए त्यांच्या काही अडचणी असतात. त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान लाडक्या बहिणीचा राग अनावर झाला म्हणून उपमुख्यमंत्री कार्यालयात तिचा असंतोष पाहायला मिळाला, अशी टीका विरोधकांनी केली आहे. या टीकेबाबतही फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, विरोधकांकडे कोणतेही मुद्दे शिल्लक नाहीत. त्यामुळे ते अशी टीका करत आहेत. एखादी बहीण चिडली असेल तर आम्ही पाहून घेऊ. कुणी जाणीवपूर्वक पाठविले असेल तर तेही पाहून घेऊ. आता माझे म्हणणे एवढेच आहे की, संबंधित महिलेची व्यथा समजून घेऊ.