मुंबई | Mumbai
मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टिनमधल्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केल्यानंतर आणि गायकवाडांना समज दिल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केल्यानंतरही गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले आहे. कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यानंतरही आमदार संजय गायकवाडांवर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली असून अशा आमदारांवर कारवाई करण्याची करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केले आहे.
विधिमंडळात यासंदर्भात विचारणा केली असता संजय गायकवाड यांच्याविरोधात कोणतीही तक्रार दाखल नसल्यामुळे त्यांची चौकशी करता येणार नाही, अशी भूमिका गृहराज्यमंत्र्यांनी मांडल्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी वरील माहिती दिली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
याप्रकरणात पोलिसांनी निश्चित चौकशी केली पाहिजे. त्यासाठी कोणीही तक्रार करायची गरज नाही. दखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस कारवाई करतील. गुन्हा दखलपात्र आहे की अदखलपात्र आहे, त्यानुसार कारवाई होईल. किती जोरात मारले आहे, यावर गुन्ह्याचे स्वरुप ठरते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यामुळे आता पोलीस स्वत: पुढाकार घेऊन संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
संजय गायकवाडांनी कृतीचे केले समर्थन
संजय गायकवाड यांनीदेखील स्वत:च्या कृतीचे समर्थन केले होते. माझा मार्ग चुकला तरी मी जे केले त्याचा पश्चाताप नाही. किंबहुना मी मारहाण केल्यामुळेच निकृष्ट अन्न पुरवणाऱ्या कँटिनवर कारवाई झाली. मी फक्त जराशी मारहाण केली. त्यामुळे एनसी होऊ शकते. हा फार मोठा गुन्हा नाही. मलाही कायदा माहिती आहे. मी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून माहिती देणार आहे. त्यांना मी दोषी वाटत असेन तर मी ते देतील ती शिक्षा भोगायला तयार आहे, असे संजय गायकवाड यांनी म्हटले होते.
नेमका प्रकरण काय आहे?
मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास संजय गायकवाड बनियन आणि टॉवेल गुंडाळून आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये दाखल झाले. त्यांच्या हातात डाळीची एक पिशवी होती. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांना ते पिशवीतल्या डाळीचा वास घ्यायला सांगत होते. एका कर्मचाऱ्याला त्यांनी अशीच पिशवी नाकाशी नेऊन वास घ्यायला सांगितले. काही बोलायच्या आतच संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली. आधी गालात मारले आणि नंतर थेट बुक्क्यांनी मारहाण केली. यात तो कर्मचारी खाली पडला. नंतर काही कार्यकर्त्यांनी संजय गायकवाड यांना तिथून बाजूला केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





