नाशिक, दि. 17 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) :
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला (Digital Life Certificate) सादर करण्यासाठी नोव्हेंबर २०२६ मध्ये विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत जिल्हा कोषागार कार्यालय, नाशिक तसेच तालुकास्तरीय उपकोषागार कार्यालयांमध्ये १९ व २० नोव्हेंबर २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या विशेष अभियानात सहभागी होऊन डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस यांनी केले आहे.
ज्या निवृत्तीवेतनधारकांनी अद्याप बँकेतील, टपाल कार्यालयातील यंत्रणेद्वारे अथवा डिजिटल लाइफ सर्टिफिकेट बँकेच्या यादीद्वारे हयातीचा दाखला सादर केलेला नाही, अशा निवृत्तीवेतनधारकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा. तसेच संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी आपला निवृत्तीवेतन आदेश, आधारकार्ड व मोबाईलसह १९ व २० नोव्हेंबर रोजी आपल्या सोयीनुसार जिल्हा कोषागार कार्यालय किंवा संबंधित तालुक्यातील उपकोषागार कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला सादर करावा, असेही आवाहन वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस यांनी केले आहे.




