देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata
नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्ताने भाविकांच्या उपस्थितीत दत्त नामाचा जयघोष करत पुष्पवृष्टी करत सायंकाळी 6 वाजता गुरुवर्य भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज तसेच साधुसंतांच्या व लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रीदत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सारे विश्व सुखी होऊ द्या, सर्व जाती-धर्मात एकोपा रहावा, दत्त जन्म प्रसंगी महंत भास्करगिरी महाराज यांनी भगवान दत्तात्रयांना प्रार्थना केली. श्रीक्षेत्र देवगड मंदिर प्रांगणात महंत भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.सायंकाळी 6 वाजता श्री दत्त मंदिर प्रांगणात आकर्षक फुलांनी सजवलेल्या, मंडपात दत्त जन्म सोहळा फुलांची उधळण करत साजरा करण्यात आला. या प्रसंगी भजन, आरती, पूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी पहाटे महंत भास्करगिरी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात येऊन अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता भास्करगिरी महाराजांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात येऊन दत्त जन्म सोहळा साजरा झाला. याप्रसंगी दत्त जन्म पाळणागीत गायिले गेले तसेच आरती करण्यात आली. भाविकांना सोहळा पाहता यावा म्हणून प्रांगणात दोन मोठे टीव्ही पडदे लावण्यात आले होते. यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले, श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी हा महोत्सव सुरू केला. त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज आपण स्वर्गसुखाचा आनंद उपभोगत आहोत. सर्व जाती धर्मातील भाविक भगवान दत्तात्रयांच्या जन्म सोहळ्यास देवगडला उपस्थित राहतात. ‘व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणीही असू नये’ अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
दत्तजयंती निमित्त शनिवारी सकाळी 8 वाजता ‘दिगंबरा… दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा..’ चा जयघोष करत मंदिर प्रांगणात भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या पालखी रथात श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. भास्करगिरी महाराजांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिर प्रांगणात पालखीची प्रदक्षिणा करण्यात आली. अग्रभागी भक्तिगीते गाणारे बँड पथक, सनई चौघडा वादक, त्यामागे भगवी पताका खांद्यावर घेत ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा जयघोष करत झेंडेकरी मिरवणुकीत सहभागी झाले होते. पहाटेपासून देवगडकडे येणारे रस्ते सुरू होते. भाविकांचा दर्शनासाठी ओघ सुरू होता. प्रवरासंगम, देवगडफाटा, नेवासा येथून देवगडकडे जाणारे रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
नेवासा, नगर, शेवगाव, गंगापूर या आगाराच्या वतीने जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. दुचाकी व चारचाकी वाहनांनी देखील भाविक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे देवस्थानच्या वतीने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.
शनिवारी सायंकाळी झालेल्या श्री दत्त जन्म सोहळ्याच्या प्रसंगी गुरुवर्य श्री भास्करगिरी महाराजांच्या मातोश्री सरुआई पाटील व स्वामींच्या मातोश्री मीराबाई मते पाटील, महंत कैलासगिरी महाराज, महंत ऋषिनाथ महाराज, विश्व हिंदू परिषदेचे आप्पासाहेब बारगजे, डॉ. जनार्धन मेटे महाराज, खा. भाऊसाहेब वाकचौरे, आ. विठ्ठलराव लंघे, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, संतोष माने, अॅड. सुनील चावरे, बजरंग विधाते, सरपंच अजय साबळे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. आज रविवारी सकाळी भास्करगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.
देवगड संस्थान येथे श्री दत्त जयंती महोत्सवाच्या दिनी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी भगवान दत्तात्रय. तथा श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर भास्करगिरी महाराज यांचे पूजन जिल्हाधिकारी यांनी केले. भास्करगिरी महाराज यांनी देवस्थानच्यावतीने स्वागत सन्मान केला.