शिर्डी । प्रतिनिधी
नाताळ, वर्षाखेर व नववर्षानिमीत्त साईनगरीत आठ लाखांहून अधिक भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली. या नऊ दिवसांच्या कालावधीत भाविकांनी तब्बल १६. ६१ कोटींची देणगी साईचरणी अर्पण केल्याची माहिती संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
नाताळ, वर्षाखेर व वर्षारंभाच्या निमीत्ताने २५ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ दरम्यान मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी भरभरुन दान साईबाबांना अर्पण केले. या काळात दानपेटीत ६ कोटी १२ लाख, ९१ हजार, देणगी कक्षात ३ कोटी २२ लाख २७ हजार, जनसंपर्क कार्यालयातील सशुल्क पासद्वारे १ कोटी ९६ लाख ४४ हजार, डेबीट, क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी व मनी ऑर्डरच्या माध्यमातून ४ कोटी ६५ लाख ७३ हजार अशी १५ कोटी ९७ लाख ३७ हजार रुपये देणगी रोख स्वरूपात प्राप्त झाली आहे.
याशिवाय ५४ लाख ४९ हजार रुपयांचे ८०९.२२० ग्रॅम सोने व ९ लाख ९४ हजारांची १४ किलो ३९८ ग्रॅम चांदीही भाविकांनी साईचरणी अर्पण केली. याशिवाय परकीय चलनही जमा झालेले आहे. या देणगीत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे नऊ दिवसांत तब्बल जवळपास पावणे सतरा कोटी रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली.
संस्थानच्या प्रसादालयातही सहा लाखांहून अधिक भाविकांनी मोफत प्रसाद भोजनाचा तर १ लाख ३५ हजार भाविकांनी नास्ता पाकीटांचा आस्वाद घेतला. या काळात ९ लाख ४७ हजार ७५० बुंदी लाडू प्रसाद पाकीटांची विक्री झाली. याद्वारे संस्थानला १ कोटी ८९ लाख ५५ हजार रूपये प्राप्त झाले. याच बरोबर ५ लाख ९८ हजार ६०० भाविकांनी मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचा लाभ घेतला.
साईसंस्थानला प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा साईबाबा व साईनाथ। रुग्णालय, साईप्रसादालय मोफत भोजन, संस्थानच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीकरीता, साईभक्तांच्या सुविधाकरीता उभारण्यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरीता करण्यात येत असल्याचेही गाडीलकर यांनी सांगितले.