मुंबई | Mumbai
मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालाने दणका देत घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवले आहे. मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा-मुंडेंनी (Karuna Sharma-Munde) वांद्रे न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला आहे. त्यानुसार, मंत्री धनंजय मुंडेंना करुणा मुंडे यांना महिन्याला २ लाख रुपयांची पोटगी द्यावी लागणार आहे. यात करुणा मुंडे यांना १ लाख २५ हजार तर मुलगी शिवानीला तिच्या लग्नापर्यंत महिन्याला ७५ हजार रुपये द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या की, “एखाद्याचा पापाचा घडा भरला तर परमेश्वरही दिशा देतो, असं मला वाटतंय. आताच्या घडीला ४ फेब्रुवारीला आलेली ऑर्डर मी वाचली, अत्यंत वाईट अशी ही ऑर्डर आहे. मी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनी बीडमध्ये कशी दहशत पसरली आहे हे आपण पाहतोय, आता त्यानंतर हिंसाचार झाल्याचे कोर्टाने मान्य केले आहे. आतातरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावर निर्णय घेणार की नाही. घरगुती हिंसाचार करणारा मंत्री यांना यांच्या मंत्रिमंडळात चालत असेल, तर सगळ्या लाडक्या बहिणी तुमच्यावर चवताळतील. करुणा मुंडे ज्या इतक्या वर्ष लढा देत आहे, एक स्त्री म्हणून मी त्यांचं समर्थन करते. तसेच त्यांना अभिनंदनचा मेसेजही पाठवला आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच “करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. करुणा, या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १ लाख २५ हजार रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत”, असे दमानिया ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
तर माध्यमांशी संवाद साधताना तृप्ती देसाई (Tuprti Desai) म्हणाल्या की,”करूणा शर्मा यांना न्याय मिळाला आहे. त्या नेहमीच सांगायच्या की मी धनंजय मुंडेंची पत्नी आहे. त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार झाला आहे. कोणतीही दखल घेतली नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना न्याय दिला. महिन्याला पोटगी किंवा त्यांच्या मुलीचा जो काही खर्च असेल ते देण्याचे मान्य केले. मुंडेंनी आता तरी आरोप मान्य करावे. तसेच धनंजय मुंडेंनी पदाचा गैरवापर करत अनेक कृत्य केले आहेत. मला आता वाटतंय त्यांच्या पापाचा घडा भरत आला आहे. खंडणी प्रकरणातही मुंडेंचीच माणसं आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर येत आहे, कराड हा मुंडेंचा उजवा हात आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता. त्यांनी दिलेला नाही. सर्व पुरावे आले आहेत”, असे त्यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडेंनी वकिलामार्फत मांडली आपली बाजू
मंत्री धनंजय मुंडेंनी त्यांच्या वकिलामार्फत या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. वकिलांनी म्हटले आहे की,”धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर काहीही निर्णय अद्याप दिलेला नसून, याबाबत काही माध्यमांवर दाखविण्यात येत असलेले वार्तांकन निराधार आहे.केवळ अर्जदारांच्या आर्थिक गरजांच्या आधारावर हा आदेश करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपची कबुली दिली होती, ज्याच्या आधारावरच न्यायालयाने हा आदेश दिला आहे, अशी माहिती मुंडेंच्या वकील सायली सावंत यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.