मुंबई । Mumbai
राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील सामाजिक विषमतेवर बोलत आहेत. बीड जिल्ह्यात पोलिसांना स्वतःचे आडनाव लावता येत नाही, ही सामाजिक समता आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बीड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
आपल्या भाषणात धनंजय मुंडे म्हणाले, “आपल्या जिल्ह्यातच नाही तर राज्यात अनेक ठिकाणी सामाजिक समानता राहिलेली नाही. बीड जिल्ह्यात पोलिसांना सुद्धा स्वतःचं आडनाव लावता येत नसेल, तर ही सामाजिक समानता आहे का? हे सांगताना मला लाज वाटते. पण आता सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन मागे जे घडले ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे.”
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात महापुरुषांना केवळ एका समाजापुरते मर्यादित न ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आपण सर्वांनी आपले महापुरुष बांधून घेतले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजानेच साजरी करायची का?” शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य फक्त मराठा समाजासाठी नव्हे, तर अठरा पगड जाती-धर्मांसाठी उभे केले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. या विधानामुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक परिस्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मुंडे यांच्या या थेट भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.




