अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाची आणि बलिदानाची साक्ष देणार्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील ‘धर्मवीर गड’ (पेडगाव) बाबत राज्य सरकारने एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने 7 सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी करत या गडाला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या धर्मवीर गडाचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.
भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी धर्मवीर गडाच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याआधी पाचपुते यांच्याच मागणीनुसार पेडगाव येथील या ऐतिहासिक बहादूरगडाचे नामकरण धर्मवीर गड असे अधिकृतपणे करण्यात आले होते. त्यानंतर आता हा गड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाल्यामुळे आमदार विक्रम पाचपुते यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.




