Tuesday, September 8, 2026
Homeक्राईमCrime News : आयटी कंपनीच्या सोर्स कोड चोरीप्रकरणी दुबईहून परतताच संशयिताला अटक

Crime News : आयटी कंपनीच्या सोर्स कोड चोरीप्रकरणी दुबईहून परतताच संशयिताला अटक

उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर होता पसार || आठ दिवसांची पोलीस कोठडी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअर सोर्स कोड चोरीप्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत पसार असलेल्या संशयित आरोपीला अखेर अटक केली. मंदार प्रदीप पाथरीकर (वय 33, रा. नवी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो दुबई येथे पळून गेला होता. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दुबईहून पुणे विमानतळावर आल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली.

- Advertisement -

सोमवारी (7 सप्टेंबर) आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 15 सप्टेंबरपर्यंत आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी नितीन गोपालदास भराडीया (वय 42, रा. पुणे) यांनी मार्च 2026 मध्ये अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या होत्या. त्या आधारे दोन गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी एका गुन्ह्यात पाथरीकर याला अटक करण्यात आली आहे.

भराडीया हे पीआरएम सॉफ्ट सोल्युशन प्रा. लि. या कंपनीत प्रमुख धोरण अधिकारी (सीएसओ) म्हणून कार्यरत आहेत. संबंधित कंपनी 2013 पासून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे काम करत असून वित्तीय व्यवस्थापन, डीबीटी/एसएनए प्रणाली, पीएफएमएस इंटिग्रेशन तसेच विविध वेब आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स विकसित करण्याचा कंपनीला मोठा अनुभव आहे. ग्रामविकास विभागासाठी कंपनीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने 2024 मध्ये ‘एकात्मिक एकल पोर्टल’ (एसयूपी) ही महत्त्वाची संगणकीय प्रणाली विकसित केली होती. ही प्रणाली 1 एप्रिल 2025 पासून अधिकृतपणे कार्यान्वित करण्यात आली होती.

मात्र, कंपनीने केलेल्या कामाचे देयक प्रलंबित राहणे तसेच बँकेकडून करार पूर्ण करण्यात झालेल्या विलंबामुळे कंपनीने एप्रिल 2025 मध्ये एसयूपी प्रणालीची सेवा बंद केली होती. सेवा बंद झाल्यानंतर बँकेकडून संबंधित प्रणालीचा सोर्स कोड देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यासाठी कोणताही औपचारिक करार नसल्याचे सांगत कंपनीने सोर्स कोड देण्यास नकार दिला होता.

यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या एका व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान बँकेकडून सादर करण्यात आलेली प्रणाली ही कंपनीने विकसित केलेल्या एसयूपी प्रणालीशी साधर्म्य असलेली असल्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कंपनीने अंतर्गत तपास सुरू केला. या तपासात काही माजी कर्मचार्‍यांनी कंपनीचा अत्यंत गोपनीय डेटा अनधिकृतपणे क्लाउड प्लॅटफॉर्म, ई-मेल तसेच बाह्य हार्डडिस्कच्या माध्यमातून हस्तांतरित केल्याचे उघड झाले. विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून सॉफ्टवेअरचा सोर्स कोड कंपनीबाहेर पाठविण्यात आल्याचेही तपासात समोर आले. त्यानंतर अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा जणांविरूध्द गुन्हा
या प्रकरणातील आरोपींमध्ये मंदार पाथरीकर याच्यासह शैला केदार (रा. नवी पेठ, पुणे), मुकुंद दायमा (रा. हिंजेवाडी, पुणे), जालींदर गमे (रा. खडकेवाडी रस्ता, काळेवाडी रहाटे, अहिल्यानगर), योगेश चव्हाण (रा. पिंपरी-चिंचवड) आणि चैतन्य दिलीप जोशी (रा. सोलापूर) यांचा समावेश आहे. सायबर पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून सोर्स कोड चोरीमागील नेमका कट, चोरी करण्यात आलेल्या डेटाचा वापर कुठे आणि कशासाठी करण्यात आला, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात डीजेच्या दणदणाटाला लगाम

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे व ध्वनिवर्धकांच्या वापराबाबत असलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा शासकीय व प्रशासकीय आदेशांचे...