Saturday, September 26, 2026
Homeदेश विदेशधर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही आंदोलन सुरूच राहणार, दीपके यांच्या आणखी 2 मोठ्या मागण्या!

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही आंदोलन सुरूच राहणार, दीपके यांच्या आणखी 2 मोठ्या मागण्या!

दिल्ली । Delhi

दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या काही दिवसांपासून पेटलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या वादात अखेर एका मोठ्या राजकीय घडामोडीची नोंद झाली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) तीव्र आणि प्रदीर्घ आंदोलनाला मोठे यश आले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘नीट’ गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीवर सीजेपी आणि हजारो विद्यार्थी ठाम होते. मात्र, राजीनाम्यानंतर आंदोलन मागे घेतले जाईल, हा सरकारचा अंदाज मोडीत निघाल्याचे चित्र गुरुवारी जंतर-मंतरवर पाहायला मिळाले.

- Advertisement -

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी धडकताच जंतर-मंतरवर उपोषण आणि निदर्शने करणाऱ्या हजारो तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. या घडामोडीनंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी उपस्थित आंदोलकांशी संवाद साधला. “मोदी सरकारच्या कार्यकाळात राजीनामे होत नाहीत, असा एक राजकीय समज निर्माण झाला होता. परंतु, देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीच्या ताकदीपुढे अखेर सरकारला नमावेच लागले. हा देशातील प्रत्येक अन्यायग्रस्त विद्यार्थ्याचा विजय आहे,” अशा शब्दांत दीपके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा आंदोलनाचा पहिला टप्पा असल्याचे स्पष्ट करत अभिजित दीपके यांनी आंदोलन लगेच संपणार नसल्याची घोषणा केली. “आम्ही राजीनामा मिळाला म्हणून लगेच मैदान सोडणाऱ्यांपैकी नाही. विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नांची उकल होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असे सांगत त्यांनी केंद्र सरकारसमोर दोन नव्या आणि कडक मागण्या ठेवल्या आहेत:

  • आर्थिक मदतीची मागणी: ‘नीट’ परीक्षेतील गोंधळ आणि अन्यायाला कंटाळून ज्या दुर्दैवी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या पीडित कुटुंबांना केंद्र सरकारने तातडीने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली पाहिजे.
  • गुन्हे मागे घेणे व पोलिसांवर कारवाई: २० जुलैनंतर जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते सर्व गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत. तसेच, डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा आणि सचिन शर्मा यांच्यासह लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने केंद्र सरकारला मोठा राजकीय धक्का बसला असला, तरी सीजेपीने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण अजूनही तापलेलेच आहे. जंतर-मंतरवरून पेटलेली ही आंदोलनाची ठिणगी आता संपूर्ण देशात पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, सीजेपीच्या उर्वरित मागण्यांवर आणि विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्ह्यांबाबत केंद्र सरकार आता काय पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : दुष्काळसदृश परिस्थितीतील शेतकऱ्यांना विविध सवलतींचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने...

0
नाशिक | Nashik खरीप हंगाम-२०२६ मध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १० तालुक्यांत प्रथम कळ (Trigger-1) लागू करण्यात आला आहे....