धुळे | Dhule
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात (Gulmohar Government Rest House) आमदारांना (MLA) देण्यासाठी पाच कोटी रुपये आणल्याचा गंभीर केला होता. यानंतर गोटे यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ ला बाहेरून कुलूप लावून तेथेच ठिय्या मांडला होता. तसेच, ही खोली जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीतच उघडण्यात यावी, अशी मागणीही गोटे यांनी केली होती. त्यानंतर ही खोली पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघडली असता तिच्यामध्ये कोट्यावधींची रोकड आढळली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार अनिल गोटे यांनी ही खोली जिल्हाधिकारी (Collector) किंवा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीतच उघडण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर रात्री ११ वाजता प्रातांधिकारी रोहन कुवर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर.आर.पाटील, शिवसेना उबाठाचे (Shivsena UBT) नरेंद्र परदेशी, कॅमेरामन माळी या पाच लोकांच्या कमिटीने खोलीचे कुलूप तोडले. त्यानंतर तपासणी केली असता खोलीत नोटा सापडल्या. यामुळे नोटा मोजण्याचे मशीन मागवण्यात आले. यानंतर नोटा मोजल्या असता तब्बल एक कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपयांची रोकड सापडली आहे.
दरम्यान, सहा तासांच्या मोजणीनंतर पोलिसांनी (Police) पंचनामा करून ही रोकड जप्त केली आहे. आज पहाटेपर्यंत शासकीय विश्रामगृह गुलमोहर याठिकाणी रोख रक्कम जप्त (Seized) करण्याची कारवाई सुरू होती. याप्रकरणी आज धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच जप्त करण्यात आलेली रक्कम देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून याप्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
विधीमंडळातील अंदाज समिती दौऱ्यासाठी धुळे जिल्ह्यात दाखल
महाराष्ट्र विधीमंडळातील अंदाज समिती तीन दिवसीय दौऱ्यासाठी सध्या धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे. या दौऱ्यात समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे. एकूण २९ आमदारांचा समावेश असलेल्या या समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करत आहेत. २९ पैकी ११ आमदार सध्या धुळ्यात दाखल झाले आहेत. या समितीत आलेल्या आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये शहरातील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहाच्या १०२ नंबरच्या खोलीत ठेवण्यात आले आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.