धुळे – Dhule – प्रतिनिधी :
भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे बोलले जाते आहे. यामुळे
धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही उलथापाटल होवून राष्ट्रवादीत जाणारे किती? याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.
भाजपात नाराज असलेल्या श्री. खडसे यांच्याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरु आहे.
या संदर्भात सातत्याने बैठकाही होत असून सोमवारी मुक्ताईनगरमध्ये झालेल्या बैठकीत घटस्थापनेचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जाते आहे.
त्यामुळे स्वाभाविकच श्री. खडसे यांचे धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील समर्थक देखील त्याचवेळी प्रवेश करणार काय? प्रवेश करणार्यांमध्ये कुणाकुणाचा समावेश असेल? भाजपचे काही नेते, आजीमाजी पदाधिकारी यांच्या पैकी राष्ट्रवादीच्या गळाला लागणारे किती? याबाबत खमंग राजकीय चर्चा रंगते आहे.
प्रा. शरद पाटलांचा प्रवेश
धुळे ग्रामीण मतदार संघाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचाही राष्ट्रवादी काँगे्रसमधील प्रवेश निश्चित झाला आहे.
त्यांच्या पवार कुटुंबियांशी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्याशी भेटीगाठी व चर्चा झाल्या आहेत. मात्र प्रा. पाटील यांचा प्रवेश श्री. खडसे यांच्या प्रवेशानंतर होईल, असेही आज एका जवळच्या कार्यकर्त्याने सांगितले.
भाजप करतोय चाचपणी
भाजपचे ज्येष्ठनेते एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेशाने खान्देशात भाजपला मोठे खिंडार पडेल असेही बोलले जाते आहे.
काही आजीमाजी पदाधिकारी हे खडसेंच्या संपर्कात असल्याची चर्चा असल्याने भाजप याबाबतची चाचपणी करीत आहे.
आपल्या पक्षातून जाण्याची शक्यता कुणाची, याचा अंदाज घेवून त्यांना पक्षांतरापासून थोपविण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत.
दोन दिवसांपुर्वीच शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी धुळे महानगरची यादी जाहीर करुन त्यात तब्बल 115 जणांना कार्यकारणीत स्थान दिले आहे.
ही कार्यकारणी म्हणजे कार्यकर्त्यांना पदांची जबाबदारी देवून थांबविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचेही बोलले जाते आहे.