अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दहशतवाद्यांशी संपर्क असल्याचा आणि बँक खात्यातून त्यांना पैसे पाठविल्याचा खोटा आरोप करत, तसेच अटक वॉरंट रद्द करण्यासाठी पैसे भरण्यास सांगून सायबर भामट्याने अहिल्यानगरमधील एका वृद्ध महिलेची तब्बल 31 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केली. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली हा प्रकार घडला असून, याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावेडी उपनगरात राहणार्या महिलेने (वय 69) याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, व्हॉट्सप क्रमांकावरून संपर्क साधणार्या प्रताप (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत फिर्यादी यांच्या व्हॉट्सप क्रमांकावर एका व्यक्तीने संपर्क साधला. आपण मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक बोलत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर फिर्यादीला डिजिटल अरेस्ट केल्याचे भासवून त्यांच्या मनात भीती निर्माण केली. तुमचा अब्दुल सलाम नावाच्या दहशतवाद्याशी संपर्क असून मुंबईतील कॅनरा बँकेच्या खात्यातून तुमच्या संपर्कातील दहशतवाद्यांना पैसे पाठविण्यात आल्याचा आरोप या व्यक्तीने केला.
या प्रकरणात तुमच्या नावाने अटक वॉरंट निघाले आहे, असे सांगून त्याने फिर्यादीला घाबरवले. अटक वॉरंट रद्द करायचे असल्यास आपण दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवावे लागतील, असेही त्याने सांगितले. अटक होण्याच्या भीतीचा गैरफायदा घेत संबंधित भामट्याने फिर्यादी कडून एकूण 31 लाख 70 हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक सागर ढिकले पुढील तपास करीत आहेत.




