Monday, September 28, 2026
Homeक्राईमCrime News : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून 15 लाखांची फसवणूक

Crime News : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून 15 लाखांची फसवणूक

सावेडीतील सेवानिवृत्त नागरिकाची सायबर पोलिसांत फिर्याद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तुमचे बँक खाते आंतरराष्ट्रीय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वापरले गेले असून तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले आहे, अशी भीती दाखवत सायबर भामट्यांनी सावेडी येथील 76 वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाची तब्बल 15 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी गुलमोहर रोड, सावेडी, येथे राहतात. त्यांनी शनिवारी (1 ऑगस्ट) रात्री सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, 22 जुलै ते 24 जुलै 2026 या कालावधीत फिर्यादी यांच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल करण्यात आला. कॉल करणार्‍या व्यक्तीने स्वतःचे नाव संदीपराव असल्याचे सांगत आपण नाशिक सिटी पोलीस मुख्यालयातून बोलत असल्याची खोटी बतावणी केली. यानंतर फिर्यादी यांचे बँक खाते आंतरराष्ट्रीय मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरण्यात आले असून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आल्याचे सांगून त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्यात आला.

या कथित चौकशीच्या नावाखाली फिर्यादींना त्यांच्या बँक ऑफ बडोदा, सावेडी शाखेतील खात्यातील 15 लाख रूपये सुरक्षित पडताळणीसाठी असल्याचे सांगत एका विशिष्ट बँक खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले. सायबर चोरट्याच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी 24 जुलै रोजी 15 लाख रूपये चेन्नई येथील दीपक्क शाखेतील येस बँकेच्या खात्यावर आरटीजीएसने पाठविले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. या प्रकरणी संदीपराव (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) तसेच संबंधित बँक खातेधारकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले करीत आहे.

नागरिकांसाठी आवाहन
पोलीस, सीबीआय, ईडी, न्यायालय किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा डिजिटल अरेस्टच्या नावाखाली व्हिडिओ कॉल करून पैसे भरण्यास सांगत नाही. अशा प्रकारचे कॉल, व्हिडिओ कॉल किंवा बँक खात्यात पैसे वर्ग करण्याच्या सूचना मिळाल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. तातडीने 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

शेअर

शेअर बाजारात Black Monday; सेन्सेक्स १,१०० अंकांनी घसरला, निफ्टी २२,८०० खाली

0
मुंबई | Mumbaiआठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. जागतिक भू-राजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिकेतील वाढते बॉण्ड यील्ड आणि...