Thursday, May 2, 2024
Homeअग्रलेखदिशादर्शक निर्णय

दिशादर्शक निर्णय

समाजात अनेक चांगल्या घटना घडत असतात. काही घटना वरवर नगण्य वाटत असल्या तरी बदलाची चाहूल देणार्‍या असतात. अशा घटनांचेही समाजावर दीर्घकालीन परिणाम होत असतात. अशा घटनांची नोंद घेणे ही प्रसारमाध्यमांची देखील जबाबदारी असते. अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली. त्याचे वृत्त माध्यमात झळकले आहे.

मंद्रुप हे सोलापूर दक्षिण तालुक्यातील एक छोटेसे गाव! गावात भटक्या मरिआईवाले समाजाची वस्ती आहे. उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागणे ही या समाजाची परंपरा! समाजातील एका कुटुंबातील मुलीचा विवाह ठरला होता. लेकीचे लग्न थाटात लावून देण्याचे कुटुंबियांनी ठरवले होते. नवर्‍या मुलाची हत्तीवरुन वरात काढली जाणार होती. त्यासाठी मोठा खर्च करायची तयारीही केली होती. गावच्या पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांची भेट घेतली. लग्नात वायफळ खर्च करु नका असे समजावून सांगितले. दोन्ही कुटुंबियांनी पोलिसांना साथ देऊन हत्तीवरुन वरात काढण्याचा निर्णय रद्द केला. त्या पैशातून परिसरातील खेळाडूंना क्रीडा साहित्याचे वाटप केले असे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे.

- Advertisement -

विवाह हा दोन कुटुंबाचा आनंद सोहळा असतो. यानिमित्ताने दोन कुटुंबे नात्यात बांधली जातात. तथापि अलीकडच्या काळात विवाहांवर वारेमाप खर्च करण्याची नवपरंपरा रुजतांना आढळते. पूर्वी एका दिवसात लग्न सोहळा पार पडायचा. आता किमान दोन दिवस तरी विविध कार्यक्रम होतात. त्याशिवाय प्री वेडिंग शुट, पोस्ट वेडिंग शुट करण्याची हौस देखील पुरवली जाते. या सगळ्या गोष्टींवर वारेमाप खर्च होत असतो. असा खर्च करण्याची आर्थिक परिस्थिती असते त्यांच्याविषयी कोणालाही कोणताही आक्षेप का असावा? तथापि यामुळे आपल्याही कुटुंबातील विवाह भपकेबाज व्हावा असे ज्यांची परिस्थिती नाही त्यांनाही वाटू लागते.

‘हौसेला मोल असते’ याचाही बहुधा विसर पडतो. मंद्रुप विवाह सोहळ्यातील वधुवराच्या पालकांची माध्यमात प्रसिद्ध झालेली प्रतिक्रिया याचा चपखल नमुना ठरावी. ‘आम्ही भटक्या समाजाचे. भिक्षा मागून खातो; पण मोठमोठी लग्न होताना बघतो. त्यामुळे आमच्याही मुलांचे लग्न थाटात झाले पाहिजे असे वाटत होते. म्हणूनच लग्नाची वरात हत्तीवरुन काढण्याचे ठरवले होते, पण तसे न करता त्याच पैशाची समाजाला मदत केली. त्याचा आनंदच झाला आहे’ असे वधू आणि वराच्या वडिलांनी माध्यमांना सांगितले.

मूल्यांची जपवणूक आणि सामाजिक बांधिलकी रुजवणार्‍या विवाहांची संख्या हळूहळू का होईना पण वाढत आहे. जळगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विवाहात आलेल्या पाहुण्यांना महापुरुषांची चरित्र पुस्तके भेट देण्यात आली. लातूरमध्ये एका कुटुंबाने काही जोडप्यांचा सामुदायिक विवाह लावून दिला. शिर्डीतील एका कुटुंबाने ‘सव्वा रुपयात लग्न’ हा उपक्रम सुरु केला आहे.

या उपक्रमांतर्गत 22 जोडपी विवाहबद्ध झाली. हा उपक्रम 2001 सालापासून राबवला जातो. तथापि दक्षिण सोलापूरमधील मंद्रुप गावातील विवाहाची समाजाने विशेष दखल घ्यायला हवी. त्यांनी हत्तीवरुन वरात न काढण्याचा निर्णय घेतला. जो त्यांच्या समाजालाही नवे वळण देणारा ठरु शकेल. एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली तर लोक नक्की ऐकतात आणि चांगल्या बदलाचा आदर्श नमुना समाजासमोर उभा राहतो हेही यातून लोकांच्या लक्षात येऊ शकेल. म्हणूनच समाजानेही या विवाहसोहळ्याची दखल घ्यायला हवी. दोन्ही कुटुंबातील सदस्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारायला हवी. समाजाचे पाठबळ चांगल्या बदलांची वाट प्रशस्त करणारे ठरेल. 

- Advertisment -

ताज्या बातम्या