मुंबई | Mumbai
सेलिब्रिटी मॅनेजर असलेल्या दिशा सालियनची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दिली. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. विविध पुराव्यांचा दाखला देत पोलिसांनी उच्च न्यायालयात दावा केला आहे की या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा घातपात किंवा हत्येचा प्रयत्न दिसत नाही तसेच तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार देखील झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही. या याचिकेवर पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अशी माहिती समोर येत आहे.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे ही याचिका बुधवारी सुनावणीसाठी आली, त्यावेळी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात सतीश सालियन यांनी केलेल्या दाव्यांचे खंडन केले आहे. प्रतिज्ञापत्रात घटनेच्या दिवशी नेमके काय घडले हे नमूद केले आहे. तसेच घटनेच्या वेळी दिशासह असलेला तिचा प्रियकर आणि मित्रांनी दिलेल्या जबाबात सत्य असल्याचे म्हटले आहे.
राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ
यासंदर्भात सीबीआय तपासाबाबत भूमिका स्पष्ट करण्याकरिता आणखीन थोडा अवधी देण्यात यावा, अशी विनंती सरकारी वकील प्राजक्ता शिंदेंनी न्यायालयाकडे केली, जी उच्च न्यायालयाने स्विकारत राज्य सरकारच्या विनंतीवर या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांकरिता तहकूब केली.
याचिकेत काय म्हंटले आहे?
दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती, ती अशी आत्महत्या करणे शक्यच नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असे मला त्यावेळी भासवण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी ते सांगत असलेली गोष्टच खरी असल्याचे सतत आपल्यापुढे रेटत होते. याच लोकांनी माझ्या कुटुंबाला सतत दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवले होते, आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती, असा आरोपही सालियन यांनी आपल्या याचिकेतून केला आहे.
राजकीय सुडबुध्दीने याचिका – आदित्य ठाकरे
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी निर्णय देण्याआधी बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे ही मागणी केली. या प्रकरणी आपण प्रतिवादी नसलो तरीही आपले नाव राजकीय सूडबुद्धीने गोवण्यात आले आहे. आपल्याविरोधात द्वेषाने, वैयक्तिक आणि राजकीय सूड उगवण्यासाठी खोटी, निरर्थक याचिका केल्याचा दावा ठाकरे यांनी याचिकेत केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




