
मुंबई । Mumbai
मनोरंजन जगतापासून ते राजकारणाच्या गदारोळात दीर्घकाळ वादग्रस्त ठरलेल्या दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले असून, ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) अंतर्गत नव्याने प्रथम खबर अहवाल (FIR) दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यासोबतच तपासाची कमान एका वरिष्ठ सीबीआय अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून झाला होता. त्यावेळी पोलिसांनी ही घटना आत्महत्या मानत अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली होती. मात्र, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी निष्पक्ष आणि सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली होती. न्यायमूर्तींच्या खंडपीठाने २८ ऑगस्ट रोजी या याचिकेवरील सर्व सुनावणी पूर्ण करून आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर न्यायालयाने सतीश सालियन यांच्या बाजूने निर्णय देत पोलिसांना सर्व आवश्यक सहकार्याचे निर्देश दिले.
सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले, “न्यायालयाने सीबीआयला तक्रारदाराचा (सतीश सालियन) नवा जबाब नोंदवून एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मालाड येथील मालवणी पोलीस ठाण्याला या प्रकरणाशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे आणि पुरावे तातडीने सीबीआयकडे सुपूर्द करण्यास सांगितले आहे.”
वकिलांनी पुढे स्पष्ट केले की, तपासादरम्यान ज्यांची नावे पुराव्यासहित समोर येतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मात्र, ज्यांच्याविरोधात पुरावे नाहीत त्यांना विनाकारण आरोपी केले जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जर सीबीआयनं तपासात नकारात्मक अहवाल (Negative Report) सादर केला, तर तक्रारदाराला त्याविरोधात ‘प्रोटेस्ट पिटिशन’ (Protest Petition) दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार बहाल करण्यात आला आहे.
दिशा सालियनच्या मृत्यूचे गूढ केवळ मनोरंजन क्षेत्रापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या राजकारणातही चांगलेच तापले होते. २०२२ च्या विधानसभा अधिवेशनात या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ झाला होता. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अत्यंत टोकाचे आरोप-प्रत्यारोप झाले होते. वरुण शर्मा, सुशांत सिंग राजपूत आणि भारती सिंग यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या दिशाच्या शवविच्छेदन (Post-Mortem) अहवालानुसार, तिच्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे नमूद होते. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या या कडक निर्देशानंतर सीबीआय या प्रकरणाचा तपास नेमका कसा पुढे नेते आणि यातून काय नवीन तथ्ये बाहेर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




