जळगाव | Jalgaon
सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या रात्री जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) पाळधी गावात दगडफेक आणि जाळपोळीची (Stone Pelting and Arson) घटना घडली. दोन गटांमधील संघर्ष उफाळून आल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, काल रात्री नवीन वर्षाच्या (New Year) स्वागताची सर्वत्र धामधुम सुरू असतांना जळगाव जिल्ह्यातील पाळधी (Paldhi) येथे दोन गटांमधील संघर्ष उफाळून आला. रात्री दहानंतर या दोन गटांमधील संघर्षाने भीषण रूप धारण केले. यातून गावातील चार दुकानांना आग (Fire) लावण्यात आली. तसेच फलक आणि वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली.
त्यानंतर पोलिसांना (Police) घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पाळधी व धरणगावच्या पोलिसांसह दंगल नियंत्रक पथकाने पाळधी येथील जमावाला पांगवले. तसेच अग्निशामक दलाच्या बंबांनी दुकानांना लावलेली आग नियंत्रणात आणली.
दरम्यान, पोलिसांनी घटनेनंतर दंगलीच्या संदर्भात तात्काळ कृती करत काही जणांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. तसेच याबाबत रात्री उशीरापर्यंत पाळधी पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर सध्या पाळधी गावातील वातावरण पूर्णपणे नियंत्रणात आले आहे. तसेच कुणीही समाजमाध्यमांवर यासंदर्भात अफवा पसरवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.