श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
किरकोळ वादातून वृद्धेचा खून करणार्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मयुर संजय भागवत (वय 25, रा. शिवाजीनगर, जि.अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने, कोळगाव येथील ताराबाई काशीनाथ चंदन (वय 72) या वृद्ध महिलेचा खून केला होता. ही घटना 30 मार्च 2023 रोजी कोळगाव येथील कुंभारगल्ली परिसरामध्ये घडली होती.
मयुर भागवत हा ताराबाई यांचा मुलगा खंडू काशीनाथ चंदन यांच्याकडे मूर्ती कारागीर म्हणून पाच-सहा वर्षांपासून काम करत होता. तो कारखाना शेजारी असलेल्या खोलीत राहत होता. 30 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5.30 वा सुमारास आरोपी हा कारखाना येथे कामास आला. ‘तू कामावर उशीरा का आला’ अशी विचारणा ताराबाई यांनी आरोपीस केली. त्यावेळी त्यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता. तुम्हाला बघून घेईन असे ताराबाई यांना म्हणून आरोपी निघून गेला. ताराबाई व तिचे पती कारखान्यामध्ये झोपलेले होते. त्यानंतर रात्री 11.30 च्या सुमारास मयताचा ओरडण्याचा आवाज आल्याने तिचा मुलगा व सून यांनी खाली येवून पाहिले असता आई ही रक्तबंबाळ होऊन खाली पडलेली होती व तिचे शेजारी आरोपी हा हातातील रक्ताने माखलेला चाकू घेऊन उभा होता.
खंडू चंदन यांना पाहताच आरोपी हा हातातील चाकू टाकून पळून गेला. त्यानंतर आकाश चंदन व गौरव पुरी यांनी आरोपीचा कोळगाव बसस्टँड येथे शोध घेतला असता तो मिळून आला. त्याला घटनास्थळी आणून विचारणा केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. जखमी महिलेस अहमदनगर येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे अॅडमिट केले. उपचारादरम्यान ताराबाई मयत झाल्या. खंडू चंदन यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला होता.
सर्व साक्षी आणि पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. फिर्यादी, चाकूविक्रेता संजय तीवाटणे, डॉ. एस. के. सोनवणे, आकाश चंदन, गौरव पूरी, तपासी अधिकारी पीएसआय चाटे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयामध्ये सरकारी वकील म्हणून पुष्पा कापसे (गायके) यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी आशा खामकर, सुजाता गायकवाड, संग्राम देशमुख यांची सहाय्य केले.