मुंबई । प्रतिनिधी Mumbai
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी राज्यभरातील ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार २९ कोटी रूपयांची रक्कम जमा करण्यात आली. कर्जमाफी योजनेसाठी लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम वेगात सुरू असून महिनाभरात ८० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’चा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी कर्जमाफी योजनेतील पहिल्या हफ्त्याचे वितरण करण्यात आल्याची माहिती दिली.
आषाढी एकादशीला राज्य सरकारने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची पहिली यादी जारी केली होती. सर्व ग्रामपंचायतींना ही यादी पाठवली. तिथे यादीचे वाचन झाले. त्यांतर शेतकऱ्यांनी केवळ आधार प्रमाणीकरण करून, ॲग्रीस्टॅक क्रमांक देण्याची आवश्यकता होती. इतर कोणतीही कागदपत्रे न मागता ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या यादीतील शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत आधार प्रमाणीकरण झालेल्या ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार २९ कोटींचे वितरण करण्यात आले आहे. जसजशी खाती प्रमाणित होतील तस तसे रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. साधारणपणे महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, अद्याप १८ ते १९ लाख खात्यांची प्रक्रिया सुरू आहे. तर जवळपास १२ लाख खात्यांच्या आधार क्रमांकासह अन्य तांत्रिक चुका असून ती यादी बँकांना परत पाठवली आहे. आठवडाभरात या चुकाही दुरूस्त होतील आणि आधार प्रमाणीकरणानंतर या खात्यातही कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
दोन टप्प्यात कर्जमाफी योजना अंमलात आणली जाणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. साधारण महिन्याभरात पहिल्या टप्प्यातील ८० टक्के खात्यात ही रक्कम जमा होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाईल.




