मुंबई | Mumbai
बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया याला मिठी नदी गाळ उपसा प्रकल्पातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अटक केल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी दिवसभर चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मोरियाला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले असून त्यानंतर पुढील चौकशीसाठी मुंबई पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले.
दिनो मोरियावर यापूर्वी दिशा सालियान प्रकरणातही आरोप करण्यात आले होते. इतकेच नाही तर मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात दिनो मोरियाला ईडी चौकशीलाही सामोरे जावे लागले होते. तसेच, त्याच्या राहत्या घरी छापेमारीही करण्यात आली होती.
२००५ पासून सुरू असलेल्या या प्रकल्पात साधारणपणे १३०० कोटी रुपयांहून अधिकचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. विशेषतः २०१९ ते २०२१ या कालावधीत सुमारे ६५ कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला असून, त्यावर आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि सक्तवसुली संचालनालय (ED) तपास करत आहेत. ईडीने दिनो मोरियाच्या घरावर छापा मारला होता. त्यावेळी काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील मिठी नदीच्या गाळ उपशासाठी आणि स्वच्छतेसाठी मुंबई महापालिकेने विविध कामे आणि कंत्राटे दिली होती. या कामांमध्ये कंत्राट प्रक्रिया, यंत्रसामग्रीचा वापर, गाळ वाहतूक आणि त्याची विल्हेवाट यामध्ये कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. EOWच्या तपासानुसार, या प्रकरणात महापालिकेला सुमारे ₹65.54 कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीतील मिठी नदी गाळ उपसा कामांशी संबंधित व्यवहार तपासाच्या कक्षेत आहेत. काही कंत्राटदारांनी बनावट कागदपत्रे आणि MoU वापरल्याचा आरोपही FIRमध्ये करण्यात आला आहे.
१३ जणांविरोधात आधीच गुन्हा
या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या EOWने विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. तपासादरम्यान महापालिका अधिकारी, कंत्राटदार आणि मध्यस्थ अशा १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात केतन कदम आणि जयेश जोशी यांच्यासह काही आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. तपासात काही कंत्राटदारांनी गाळ उपसा करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीच्या भाड्याबाबत कथित अनियमित व्यवहार केल्याचे समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याशिवाय गाळ वाहतुकीसंदर्भातील कागदपत्रे, वजनकाटा नोंदी आणि डंपिंग साइटशी संबंधित कागदपत्रांचाही तपास करण्यात आला आहे.
मुंबईतील मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आज (2 ऑक्टोबर) सकाळपासून दिनो मोरिया याची चौकशी सुरू होती. सुमारे आठ तास चाललेल्या या चौकशीनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलीय.




