Tuesday, October 6, 2026
HomeनगरAhilyanagar : बुधवारपासून माघारीसाठी दाढी कुरवळावी लागणार

Ahilyanagar : बुधवारपासून माघारीसाठी दाढी कुरवळावी लागणार

दाखल अर्जांची आज छाननी || 22 ऑक्टोबरपर्यंत माघारीची मुदत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगरसह राज्याचे लक्ष लागलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज, मंगळवार (दि. 6) छाननी होणार आहे. त्यानंतर उद्या, बुधवार (दि. 7) पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. माघारीसाठी 22 ऑक्टोबरपर्यंत मुदत असल्याने पुढील पंधरा दिवसांत इच्छुकांची मनधरणी, नेत्यांच्या गाठीभेटी आणि राजकीय गणिते जुळविण्याची धावपळ सुरू होणार आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार (दि. 5) रोजी संपली. मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आता आजच्या छाननीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र आणि अपात्र उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया होणार असून, उद्या पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. याच क्षणापासून माघारीची प्रक्रिया सुरू होईल. 22 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने आता खरी राजकीय कसोटी सुरू होणार आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांना इच्छुक उमेदवारांची मनधरणी करावी लागणार असून पुढील पंधरा दिवसांत गाठीभेटींचे सत्र रंगणार आहे. त्यामुळे माघारीसाठी दाढी कुरवळावी लागणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कोणाला माघार घेण्यासाठी राजी केले जाते, कोणाला भविष्यातील आश्वासन दिले जाते आणि कोण आपला अर्ज कायम ठेवत निवडणुकीच्या मैदानात उतरतो, यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे 22 ऑक्टोबरनंतरच प्रत्यक्षात किती जागांवर निवडणूक होणार, हे स्पष्ट होईल.

त्यामुळे आता छाननीनंतर पात्र ठरणार्‍या उमेदवारांपैकी किती जण माघार घेतात, कोणते गट आपापले राजकीय गणित जुळवतात आणि किती जागांवर थेट सामना होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एकूणच, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपल्यानंतर आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा खरा राजकीय खेळ सुरू झाला आहे. काही मतदारसंघांत बिनविरोधची चिन्हे दिसत असली तरी अकोले, श्रीगोंदा, कर्जत, नगर, पारनेर, पाथर्डी आणि अन्य मतदारसंघांत इच्छुकांची मोठी संख्या असल्याने पुढील माघारीच्या काळात नेत्यांच्या मनधरणीला वेग येणार आहे. त्यामुळे अंतिम यादीत किती उमेदवार मैदानात राहतात, यावरच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील खरी रंगत ठरणार आहे.

बिनविरोधसाठी टायमिंग जुळवणार- आ. जगताप
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरूच असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. संगमनेर येथे यासाठी बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, काही नेत्यांना वेळेअभावी उपस्थित राहता आले नाही. बैठकीबाबत काहीजण वेगवेगळी वक्तव्ये करीत असले तरी त्यात तथ्य नसल्याचे सांगत जगताप म्हणाले, जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात सर्वांशी संपर्क साधत आहेत. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी 22 ऑक्टोबरपर्यंत प्रयत्न सुरू राहणार असल्याचेही आ. जगताप यांनी स्पष्ट केले. काहींचे टायमिंग जुळले आहे आणि ज्यांचे जुळलेले नाही, त्यांचेही 22 तारखेपर्यंत जुळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छाननीत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचा लागणार कस

रद्द झालेल्या संस्थांच्या प्रतिनिधींचे अर्ज || पात्र उमेदवारांचे अर्ज कायम ठेवण्याचे आव्हान

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी होत असून, या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्यासमोर अर्जांची वैधता तपासण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दाखल झालेल्या अर्जांमध्ये अस्तित्वात नसलेल्या अथवा रद्द झालेल्या संस्थांच्या प्रतिनिधींनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे छाननीच्या प्रक्रियेत संबंधित संस्था प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत का, त्यांची नोंदणी कायम आहे का, तसेच संबंधित उमेदवार त्या संस्थेचा अधिकृत प्रतिनिधी आहे का, याची तपासणी करावी लागणार आहे. रद्द झालेल्या संस्थांच्या प्रतिनिधींचे अर्ज नियमानुसार बाद करतानाच पात्र उमेदवारांचे अर्ज कोणत्याही त्रुटीविना कायम ठेवण्याची जबाबदारी निवडणूक यंत्रणेसमोर राहणार आहे.

जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने प्रत्येक अर्जाची कागदपत्रे, संबंधित संस्थेची पात्रता आणि उमेदवाराची मतदारसंघनिहाय पात्रता तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. एखाद्या अर्जावर हरकत आल्यास त्याचीही नियमानुसार पडताळणी करून निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आजच्या छाननी प्रक्रियेकडे उमेदवारांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले असून, छाननीनंतर कोणते अर्ज वैध ठरतात आणि कोणते अर्ज बाद होतात, यावर पुढील निवडणूक चित्र मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. उद्या (दि. 7) पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच दिवसापासून माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : शंकरराव गडाखच नेवासा सहकाराचे किंग

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत नेवासा तालुक्यात पुन्हा एकदा गडाख परिवाराचा सहकारातील दबदबा अधोरेखित झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम...