अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिनविरोध न झालेल्या दहा जागांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या जागांसाठी आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून, दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेच्या सारीपाटावर उर्वरित दहा जागांवर कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दहा जागांपैकी सोसायटी मतदारसंघातील चार जागांचे निकाल सर्वप्रथम जाहीर होणार आहेत. पारनेर, अकोले, कर्जत आणि राहुरी या मतदारसंघांतील लढतींकडे विशेष लक्ष लागले आहे. त्यानंतर महिला आणि इतर राखीव प्रवर्गातील सहा जागांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील.
सोसायटी मतदारसंघात पारनेर, अकोले आणि कर्जत येथे चुरशीच्या लढती झाल्या आहेत. अकोले आणि कर्जतमध्ये उमेदवारांनी स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरून आव्हान उभे केले आहे. या लढतींमध्ये भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या गटाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. राहुरी सोसायटी मतदारसंघातील दोन्ही उमेदवार भाजपशी संबंधित असून, त्यापैकी एक विद्यमान आमदार, तर दुसरे माजी आमदारांचे पुत्र आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महिला आणि ओबीसी प्रवर्गातील जागांसाठीही चुरस पाहायला मिळाली. या मतदारसंघांमध्ये संगमनेर, कोपरगाव, राहुरी आणि नगर तालुक्यांतील मतांचे गणित निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मोठ्या तालुक्यांमधून आघाडी मिळविणार्या उमेदवारांना विजयाची संधी अधिक राहणार असून, अन्य तालुक्यांतील मतविभाजनाची भरपाई तेथून होऊ शकते.
सोसायटीनंतर राखीव जागांची मतमोजणी
जिल्हा बँकेच्या दहा जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी नऊ वाजता सुरू होईल. यासाठी तालुकानिहाय आणि मतदान केंद्रनिहाय व्यवस्थेसह 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला सोसायटी मतदारसंघातील चार जागांची मतमोजणी होईल. त्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राखीव प्रवर्गातील सहा जागांची मतमोजणी केली जाणार आहे. मतपत्रिकांचे रंग आणि मतदारसंघानुसार वर्गीकरण करून त्यांचे गठ्ठे तयार केले जातील. त्यानंतर मतांची मोजणी आणि आकडेवारीचे संकलन करून निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण 3 हजार 837 मतदार असून, मतमोजणीची प्रक्रिया सहा स्वतंत्र टप्प्यांत पूर्ण केली जाणार असल्याचे नियोजन आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण 21 जागांपैकी 11 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आजच्या निकालातून उर्वरित दहा जागांवरील विजयी उमेदवार निश्चित होतील. या निकालांमुळे जिल्हा बँकेतील राजकीय समीकरणांना कोणते वळण मिळणार, हेही स्पष्ट होणार आहे.
पारनेरच्या निकालाची सर्वाधिक उत्सुकता
सोसायटी मतदारसंघांमध्ये पारनेरची लढत सर्वाधिक प्रतिष्ठेची आणि चुरशीची ठरली आहे. खासदार नीलेश लंके यांच्या विरोधात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यांनी ताकद लावली. त्यामुळे या लढतीत लंके यांचे वर्चस्व कायम राहणार की विरोधक त्यांना धक्का देणार, याचा फैसला आज होणार आहे. पारनेरमधील निकाल केवळ एका जागेपुरता मर्यादित नसून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय शक्तिप्रदर्शनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे. अकोले आणि कर्जतच्या निकालांसह पारनेरमध्ये कोण बाजी मारणार, याचे उत्तर दुपारपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.




