Friday, May 3, 2024
Homeनगरजिल्हा बँक निवडणूक : हत्ती गेला अन् शेपटासाठी साठमारी

जिल्हा बँक निवडणूक : हत्ती गेला अन् शेपटासाठी साठमारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा सहकारी बँकेच्या चार जागांसाठी शनिवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात बिगरशेती मतदारसंघासाठी जिल्ह्यातील 14 तालुक्यातून 97.46 टक्के मतदान झाले

- Advertisement -

असून यात चार तालुक्यात मतदानाची टक्केवारी शंभर टक्के आहे. तर सोसायटी मतदारसंघातील नगर आणि पारनेर तालुक्यात शंभर टक्के मतदान झाले असून कर्जत तालुक्यात 98.65 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत बिगरशेती मतदारसंघात मनी आणि मसल पॉवर जोरदार वापर झाला असून उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या विजयासाठी उत्तरेतील ‘यंत्रणा’ आणि नगरमधील ‘सोधा’सक्रिय होते.

एकीकडे जिल्हा बँकेचे 17 संचालक बिनविरोध झालेले असताना बिगरशेती या एका मतदारसंघासाठी जोरदार राजकीय छक्के-पंजे दिसून आले. हत्ती आधीच पुढे निघालेला असताना शेपटासाठी झालेली ही साठमारी सहकार वर्तुळात चर्चेचा विषय होती.

दरम्यान, आज (रविवारी) सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून दुपारी 12 पर्यंत चारही निकाल हाती येणार असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. जिल्हा बँकेच्या 21 पैकी 17 जागा आधीच बिनविरोध झालेल्या आहेत. यात सोसायटी मतदारसंघातील 3 आणि बिगरशेती मतदारसंघातील एक अशा चार जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया शांततेत पारपडली.

नगर सोसायटी मतदारसंघात मतदारांनी मतदान केंद्रजवळ रांगा लावल्या होत्या. पारनेर आणि नगर तालुका सोसायटी मतदारसंघात शंभर टक्के मतदान झाले आहे. तर कर्जत तालुक्यात 98.65 टक्के मतदान झाले. नगरमध्ये विद्यमान संचालक माजी आ. शिवाजी कर्डिले आणि सत्यभामा बेरड यांच्यात, पारनेरमध्ये विद्यमान संचालक उदय शेळके आणि रामदास भोसले आणि कर्जतमध्ये विद्यमान संचालक अंबादास पिसाळ आणि मिनाक्षी सांळुके यांच्यात लढत होत आहे.

या निवडणुकीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून बिगरशेती मतदारसंघात चुरस निर्माण झाली. या ठिकाणी पारनेरचे प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात श्रीगोंद्यातून विद्यमान संचालक दत्तात्रय पानसरे निवडणूक रिंगणात होते. ऐनवेळी पानसरे यांनी महसूल मंत्री थोरात आणि राष्ट्रवादीचे उमेदवार गायकवाड यांच्या विरोधात मोठे आव्हान उभे केले.

पानसरे यांच्या मागे उत्तेरतील ‘यंत्रणा’ तन, मन आणि धनाने भक्कमपणे उभी राहिल्याचे चित्र होते. याच मतदारसंघासाठी नगरमधील ‘सोधा’ने पवारांना कोलदांडा देत पानसरे यांना साथ दिल्याची कुजबुज होती. या मतदारसंघात लक्ष्मी दर्शनाचे प्रकार झाल्याची चर्चा मतदान झाल्यानंतर होती. बिगरशेती मतदारसंघासाठी अकोले, कर्जत, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात शंभर टक्के मतदान झाले.

तर सर्वात कमी मतदान हे राहाता तालुक्यात 94.24 आणि जामखेडमध्ये 95.83 टक्के मतदान झाले. उर्वरित तालुक्यात कोपरगाव 95.78, नगर 97.75, नेवासा 997.65, पारनेर 98.73, राहुरी 98.70, श्रीगोंदा 95.65 आणि श्रीरामपूर 96.77 टक्के मतदान झाले आहे.

‘सोधा’ चा फायदा पानसरेंना

बिगरशेती मतदारसंघाचा फायदा उमेदवार पानसरे यांना झाला. नगर तालुक्यासह राष्ट्रवादीकडून माघार घेतलेल्या उमेदवारांनी ऐनवेळी पानसरे यांच्या मागे रसद उभी केली. त्यात पानसरे यांच्या नव्याने शिवसेना पक्षातील नगरच्या एका नेत्यासोबत नातेगोत झाले असून त्या सोधाचा फायदा पानसरे यांना झाला आहे. मात्र, नगर शहर आणि तालुक्यातील सोधाची ही मदत पानसरे यांना कितपत फायदेशीर ठरली हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे नगर तालुक्यात प्रशांत गायकवाड यांच्यासाठी त्यांची वडील सबाजीराव गायकवाड यांना पोलींग ऐजंट होण्याची वेळ आली.

मनी पॉवर जोरात ?

बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील जवळपास सर्वच बडे राजकारणी बिनविरोध झाले. हे बडे राजकारणी स्वत: निवडणूक रिंगणात नसल्याने थोरात गटाचे आाणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत गायकवाड यांच्यावर मनी पॉवर मात करताना दिसली. संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर तालुक्याने गायकवाड यांना साथ दिल्याचे म्हटले जाते. शेवगाव-पाथर्डी त्यांच्यासाठी जमेची बाजू असली तरी या दोन्ही तालुक्यात अवघे 51 मतदार आहेत. यामुळे बिगरशेती मतदारसंघात गुलाल कोणाचा हे पाहण्यासाठी 12 वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

कोणी लावल्या वटाण्याच्या अक्षदा ?

जिल्हा बँकेची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिष्ठेची केली. माघारीलाच त्यांचा गट बँकेत सत्ताधारी होणार हे स्पष्ट झाले. मात्र बिगरशेती मतदारसंघातील निवडणुक त्यांनी गंभीरपणे घेतली. ऐनवेळी विद्यमान संचालक आ.अरूण जगताप यांच्याऐवजी पारनेरच्या प्रशांत गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी पवार आणि थोरात यांनी जोर लावला. पवार आणि थोरातांच्या आदेशाला कोणत्या नेत्याच्या समर्थकांनी वटाण्याच्या अक्षदा लावल्या हे या जागेच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

आज सकाळी 9 वाजता मतमोजणी सुरु होणार आहे. ही मतमोजणी ही निवडणुक निर्णय अधिकारी यांचे जिल्हा बँकेच्या कार्यालयात करण्यात येणार आहे. त्यासाठी 7 मतमोजणी टेबलाची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलावर सेवा सोसायटी व बिगर मतदार संघाची तालुकानिहाय मतमोजणी करण्यात येणार आहे. होणारी मतमोजणी ही तीन फेर्‍यात होणार असून प्रथम फेरीत सोसायटी मतदारसंघाची मतमोजणी होणार असून दुसर्‍या फेरीत आधी सात तालुक्यातील बिगरशेती आणि त्यानंतर उर्वरित तालुक्यातील मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार आणि मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या