Friday, May 3, 2024
Homeजळगावसरकारी वकील पत्नीचा खून करणार्‍या डॉक्टर पतीला जन्मठेप

सरकारी वकील पत्नीचा खून करणार्‍या डॉक्टर पतीला जन्मठेप

जळगाव – Jalgaon

जळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत (३५, रा. सुपारीबाग, जामनेर) हिचा चारित्र्याच्या संशयावरुन खून करणार्‍या संशयित पती डॉ. भरत लालसिंग पाटील वय ७४ रा. बेलखेडे ता.भुसावळ यास जन्मपेठेची शिक्षा सुनावण्यात आली असून भरत पाटील याच्यासह पुरावा नष्ट करणाचा प्रयत्न करणार्‍या ऍड. विद्या राजपूत यांचे सासरे लालसिंग श्रीपत पाटील (७४, रा. बेलखेडे, ता. भुसावळ) यांना ४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयाने आज गुरुवारी हा निकाल दिला.

- Advertisement -

कोरोनाच्या परिस्थितीतही केवळ तीन महिन्यात खटल्याचे कामकाज होवून निकाल देण्यात आला. जळगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सरकारी वकील असलेल्या विद्या राजपूत यांचा १३ जानेवारी २०१९ रोजी उशीने तोंड व गळा दाबून खून झाला होता. विद्या राजपूत यांचा मृत्यू झाल्यानंतर पती व सासरे या दोघांनी त्यांना जामनेर व नंतर भुसावळ येथील दवाखान्यात नेले होते.

प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली होती. भुसावळ येथे मयत घोषित केल्यानंतर मृतदेह परस्पर बेलखेडे (ता.भुसावळ) या मुळगाव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला होता, तेथे विद्या राजपूत यांचा मावस भाऊ गणेश सुरळकर व बहीण प्रिया सोळंखे यांनी मृत्यूचे कारण विचारले असता हृदयविकाराने झाल्याचे पतीने सांगितले होते, मात्र चेहरा पाहिल्यानंतर शरीरावर जखमा होत्या.

प्रकरण संशयास्पद वाटल्याने विद्या यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली असता त्यासही पतीने विरोध केला. त्यामुळे ही माहिती वरणगाव पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह वरणगाव रुग्णालयात नेला. तेथे पंचनामा करून मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. दुसर्‍या दिवशी शवविच्छेदन झाल्यानंतर विद्या राजपूत यांचा मृत्यू गुदमरून तसेच तोंड व गळा दाबून झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता.

यानंतर याप्रकरणी १४ जानेवारी २०१९ रोजी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी विद्या राजपूत याचे पती डॉ. भरत लालसिंग पाटील व सासरे लालसिंग श्रीपत पाटील (७४, रा. बेलखेडे, ता. भुसावळ) या दोघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून पती कारागृहात होता तर सासरा लालसिंग पाटील हा जामिनावर होता.

जामनेर पोलिसांनी ८ एप्रिल २०१९ रोजी जामनेर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. २४ एप्रिल रोजी दोषारोपपत्र जळगाव जिल्हा न्यायालयात वर्ग झाले होते. न्या. पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. या खटल्यात १९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यापैकी १४ साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.

साक्षी, मोबाईल सीडीआर व फॉरेन्सिक अहवाल यानुसार न्या.लाडेकर यांनी आज गुरुवारी निकाल दिला. यात मयत ऍड. विद्या राजपूत यांचे पती भरत पाटील यांना कलम ३०२ अन्वये जन्मपेठेची शिक्षा तसेच एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तर कलम २०१ अन्वये सासरे लालसिंग पाटील यांना चार वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली तर बचाव पक्षातर्फे एस.के. शिरुडे यांनी बाजू मांडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या