अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदा अहिल्यानगर जिल्ह्यासह पंढरीच्या वाटेवर पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, यंदाची पंढरपूर आषाढी वारी वारकर्यांसाठी खडतर ठरणार असल्याचे चित्र आहे. वारीदरम्यान वारकर्यांचे हाल होऊ नयेत, त्यांना अन्न, निवारा आणि पाणी वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व दिंड्यांची आणि वारकर्यांची माहिती लेखी स्वरूपात मागवली होती. जिल्ह्यातून यंदा सुमारे 315 दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असल्या, तरी प्रत्यक्षात केवळ 91 दिंडी चालकांनीच आपली अधिकृत माहिती प्रशासनाकडे नोंदवली आहे.
दरवर्षी आषाढी वारीसाठी नगर जिल्ह्यासह नाशिक, जळगाव, धुळे, औरंगाबाद जिल्ह्यातील दिंड्या नगर जिल्ह्यातून विशेष करून नगर शहरातून पुढे मार्गस्थ होतात. नगर जिल्ह्यातून जाणार्या दिंड्याची संख्या ही 300 ते 315 आहे. दरवर्षी जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत होणार्या पावसाचे प्रमाण समाधानकारक असते. यंदा मात्र जुलै महिना उजेडला तरी अनेक ठिकाणी 100 मि.मी. पेक्षा कमी पाऊस आहे. तसेच झालेल्या पावसाचा जोर कमी असल्याने अद्याप शेतातील ढेकळ देखील फुटलेले नाही. कमी असणार्या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील दिंडी मार्गावर होणार असून या ठिकाणी वारकर्यांना पिण्याच्या पाण्यासह वापरण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर आहे.
जिल्ह्यातून चार मानाच्या तर अन्य 300 हून अधिक लहानमोठ्या मार्गस्थ होणार आहेत. यात सर्वात मोठी दिंडी म्हणून त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथ महाराज यांची असून त्याखालोखाल पैठणची नाथ महाराज, संत निळोबाराय महाराज आणि नेवासा येथील दिंडी यांचा समावेश राहणार आहे. या प्रमुख दिंड्यासोबत अन्य लहान दिंड्या प्रवास करणार असून यात सहभागी असणार्या वारकर्यांची संख्या ही लाखाांमध्ये राहणार आहे. या सर्वांना किमान राहण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील दिंड्यांनी सहभागी वारकरी यांची संख्या, त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणे आदीचा तपशील जिल्हा प्रशासनाने मागवला होता. त्यानूसार नगर जिल्ह्यातील अवघ्या 91 दिंड्यांनी त्यांची माहिती जिल्हा प्रशासनाला सादर केलेली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. विशेष करून नगर उत्तर जिल्ह्यातील ज्या भागातून प्रमुख्याने मोठ्या संख्याने दिंड्या मार्गस्थ होणार आहेत. त्या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने या भागात वारकर्यांना पाण्यासोबत अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाचा कस लागणार आहे.
संपर्क अधिकारी नियुक्त
जिल्ह्यातील मानाच्या चार पालख्यांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने चार प्रमुख अधिकारी हे संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहेत. यात निवृत्तीनाथ महाराज दिंडीसाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, एकनाथ महाराज यांच्या पालखीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, नेवासा येथील दिंडीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी मंजूषा ठवकर यांच्यासह ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
साधारणपणे जिल्ह्यात 25 मुक्काम
जिल्ह्यातील मोठ्या आणि लांबच्या दिंड्याचे जिल्ह्यात जास्तीजास्त 25 ठिकाणी मुक्काम होणार आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी मानाच्या पालखांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया याबाबतचे नियोजन करत आहेत.
जनआरोग्य अंतर्ग मोफत सुविधा
पंढरीच्या वाटेवर नगर जिल्ह्यात शासकीय आरोग्य विमा मंजूर असणार्या रुग्णालयात वारकर्यांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने संबंधीत रुग्णालयांना कळवण्यात आलेले असून वारकर्यांना गरजेनूसार संबंधीत ठिकाणी आरोग्य सुविधा मिळणार आहेत.
4 लाख 40 हजार वारकरी वारीत होणार सहभागी
यंदाच्या वारीच्या सोहळ्यात जिल्ह्यातील 91 दिंड्यामधून 4 लाख 40 हजार वारकरी वारीमध्ये सहभागी होणार आहेत. यात सर्वाधिक निवृत्तीनाथ महाराज यांच्या वारीत 1 लाख 50 हजार, संत निळोबाराय महाराज दिंडीत 1 लाख 20 हजार, एकनाथ महाराज यांच्या वारीत 40 हजार तर नेवासा येथील वारीत 25 हजार वारकरी सहभागी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आले आहे. अन्य दिंड्यामध्ये सहभागी वारकर्यांची संख्या ही 100 ते 7 हजारापर्यंत राहणार आहेत.
3 कोटी 86 लाखांचा निधी
जिल्ह्यातील मानाच्या दिंड्यांना जलरोधक मंडपासाठी 72 लाख, फिरत शौचालयासाठी 50 लाख, फिरते स्नान गृहासाठी 50 लाख, पिण्याचे पाणी सुविधांसाठी 5 लाख 60 हजार, वैद्यकीय सुविधा व औषधासाठी 20 लाख, पालखी मार्गावरील रस्ते सुस्थितीत करण्यासाठी 1 कोटी तर जिल्हास्तरावरून प्रचार व प्रसिध्दीसाठी 10 लाख असे 3 कोटी 86 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने 11 पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
400 फिरते शौचालय
वारीत सहभागी दिंड्यातील वारकर्यांसाठी नगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने 400 फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात एकनाथ महाराज दिंडी पैठण यांच्यासाठी 200, संत निळोबाराय महाराज दिंडीसाठी 100 तर नेवासा येथील दिंडीसाठी 100 शौचालय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवृत्ती महाराज यांच्या दिंडीसाठी नाशिक जिल्हा परिषदेकडून 250 फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन
यंदाच्या वारीत सहभागी दिंड्यांना नगर जिल्ह्यात आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे. याबाबत आदेश जिल्हाधिकारी यांना पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहेत. तसेच दिंडी मार्गावर वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याच्या सुचना प्रादेशिक परिवहन विभागाला ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात यावी, दिंडी मार्गावरील मांसाहारची दुकाने बंद ठेवण्यात यावी, दिंडीमार्गावर स्वागत कमान उभारण्यात यावी, याबाबत पोलीस, परिवहन विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाला सुचना देण्यात आलेल्या आहेत.




