अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक मोहीम राबवत एकाच दिवशी 17 ठिकाणी छापे टाकले. एमआयडीसी, कोतवाली, तोफखाना आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत जुगार, अवैध दारू तसेच गुटखा विक्रीप्रकरणी एकूण 17 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 2 लाख 25 हजार 311 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी चार पथके तयार केली. या पथकांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार मंगळवारी (29 सप्टेंबर) पथकांनी एमआयडीसी, कोतवाली, तोफखाना आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई केली. जुगार खेळविणारे तसेच अवैध दारू आणि गुटखा विक्री करणार्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचे तीन गुन्हे तर, दारूबंदी कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले.
कोतवाली हद्दीत जुगाराचा एक, तर दारूबंदीचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदीचे दोन, तर गुटखा विक्रीप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस अंमलदार विष्णू भागवत, भीमराज खर्से, सुनील मालणकर, अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, पंकज व्यवहारे, संदीप पवार, शाहीद शेख, अतुल लोटके, गणेश धोत्रे, मनोज साखरे, योगेश कर्डीले, दीपक जाधव, शामसुंदर जाधव, प्रताप देवकाते, भाऊसाहेब काळे आणि किशोर शिरसाठ यांनी सहभाग घेतला.




