अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत एकाच दिवसात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 37 ठिकाणी छापे टाकून दारू विक्री आणि जुगाराचे 37 गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत एक लाख 88 हजार 385 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती संकलित करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सहा स्वतंत्र पथके तयार केली. या पथकांना जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांची माहिती संकलित करून छापे टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बुधवारी (25 नोव्हेंबर) या पथकांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाचवेळी कारवाई केली. यामध्ये दारू विक्रीचे 24, तर जुगाराचे 13 असे एकूण 37 गुन्हे दाखल करण्यात आले.
दारू विक्रीच्या कारवाईत एक लाख 71 हजार 655 रूपये, तर जुगाराच्या कारवाईत 16 हजार 730 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारू विक्रीविरोधातील कारवाईत नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऊ गुन्हे दाखल करून एक लाख 26 हजार 510 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेवगाव येथे तीन गुन्हे, कोपरगाव तालुका येथे चार गुन्हे, कोपरगाव शहरात चार गुन्हे, एमआयडीसी येथे दोन, तर राहाता आणि शिर्डी येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगाराविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. कोपरगाव तालुका, एमआयडीसी आणि शेवगाव येथे प्रत्येकी तीन, नगर तालुका येथे दोन, तर राहाता आणि शिर्डी येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला.




