आश्वी | Ashwi
सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात तरुणांच्या विवाहाचा प्रश्न अत्यंत गंभीर आणि संवेदनशील बनला आहे. विवाहाचे योग्य वय उलटून गेल्यानंतरही लाखो तरुण अविवाहित राहत असल्याने मोठी सामाजिक समस्या निर्माण होत चालली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, छोटे व्यावसायिक आणि खासगी क्षेत्रात काम करणार्या तरुणांना विवाहासाठी वधू मिळणे कठीण झाले आहे. समाजमाध्यमे आणि विविध सर्वेक्षणांच्या विश्लेषणानुसार, बदलती जीवनशैली, घटते स्त्री-पुरुष प्रमाण आणि मुलींच्या पालकांच्या अवाजवी अपेक्षा यामुळे समाजातील तरुण पिढी नैराश्येच्या गर्तेत ढकलली जात आहे.
सध्या प्रत्येक जाती-धर्मातील मुलींचे पालक वर संशोधन करताना केवळ सरकारी नोकरी किंवा पुणे-मुंबईसारख्या महानगरात आयटी व मोठ्या कंपनीत पॅकेज असलेला मुलगा यांनाच प्रथम पसंती देत आहेत. स्वतःची बागायती शेती, दुग्ध व्यवसाय किंवा गावात चांगला रोजगार असूनही केवळ ‘शहरी ग्लॅमर’ नसल्याने ग्रामीण तरुणांना सरसकट नकार दिला जात आहे. स्वतःचे घर, चारचाकी गाडी, लाखो रुपयांचे पॅकेज आणि लहान कुटुंब अशा अवास्तव अपेक्षांच्या ओझ्यामुळे मध्यमवर्गीय, कमी शिकलेले किंवा खासगी नोकरी करणार्या तरुणांना लग्नासाठी पसंती मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, सर्वगुणसंपन्न आणि परफेक्ट जोडीदाराच्या शोधात आणि पालकांच्या हव्यासापोटी अनेक उच्चशिक्षित मुलींचेही लग्नाचे वय उलटून जात असल्याचे चित्र समाजमाध्यमांवरील चर्चांमधून समोर येत आहे.
लग्नाच्या या गंभीर समस्येचा फायदा घेत समाजात लग्न जमविणार्या बोगस एजंट महिला व पुरुषांचा सुळसुळाट झाला आहे. चांगले स्थळ दाखवतो असे खोटे आमिष दाखवून हतबल कुटुंबांकडून लाखो रुपये उकळले जात आहेत. अनेक तरुण कर्ज काढून या एजंटांना पैसे देतात, मात्र पदरी केवळ फसवणूक आणि निराशाच पडते. या सततच्या नकारामुळे आणि आर्थिक लुबाडणुकीमुळे तरुणांमध्ये प्रचंड मानसिक तणाव, नैराश्य, एकाकीपणा आणि सामाजिक उपेक्षेची भावना वाढीस लागली आहे. परिणामी, समाजाचा कणा असलेली उद्यमशील तरुण पिढी आपल्या कामापासून आणि शेतीपासून दूर जात आहे. ही केवळ वैयक्तिक समस्या न राहता, भविष्यात सामाजिक असमतोल निर्माण करणारी धोक्याची घंटा ठरत आहे.
हा सामाजिक पेच सोडवण्यासाठी आता राज्य शासनाने आणि समाजाने एकत्र येऊन पावले उचलण्याची नितांत गरज आहे. राज्यातील अविवाहित तरुणांच्या समस्येचा सखोल अभ्यास करून उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. तसेच विवाहाबाबत अवास्तव अपेक्षा, आर्थिक प्रतिष्ठेचा अतिरेक आणि हुंडा प्रथा कमी करण्यासाठी कायमस्वरूपी समुपदेशकांची नियुक्ती करून मुलींच्या पालकांची मानसिकता बदलण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे अत्यंत आवश्यक आहे.
केवळ पॅकेज आणि शहराचे आकर्षण पाहून जोडीदाराची निवड करण्यापेक्षा, मुलाचे चारित्र्य, कष्ट करण्याची तयारी आणि कौटुंबिक संस्कार यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. मुलींच्या पालकांनी आपला दृष्टिकोन बदलला, तरच ही सामाजिक कोंडी फुटू शकेल. सध्या बहुतांश गावात विविध समाजातील एकत्रित आकडेवारीनुसार तिशी ओलांडलेले सरासरी 150 ते 200 तरुण अविवाहित असल्याचे दिसून येतात. त्यामुळे तरुणांचे लग्न जुळत नसल्याने भविष्यात मोठे धोके निर्माण होऊ शकतात.
– अशोक पर्वत (सामाजिक विश्लेषक)




