Monday, September 28, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा पोलीस दलातील अंमलदारांच्या बदल्यांना मुहूर्त

Ahilyanagar : जिल्हा पोलीस दलातील अंमलदारांच्या बदल्यांना मुहूर्त

4 जूनला पोलीस मुख्यालयात दरबार || पसंतीच्या ठिकाणानुसार नियुक्तीची संधी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा पोलीस दलातील चालू वर्षीच्या प्रशासकीय बदली प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला असून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गुरूवारी (4 जून) पोलीस मुख्यालयात बदली दरबार आयोजित केला आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील सुमारे 300 पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

एका पोलीस ठाण्यात किंवा शाखेत सलग अथवा खंडित स्वरूपात पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अंमलदारांकडून यापूर्वीच तीन पसंतीच्या ठिकाणांसह अर्ज मागविण्यात आले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कार्यकाळात ही प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, 30 एप्रिल रोजी त्यांच्या बदलीनंतर अंमलदारांच्या बदल्या रखडल्या होत्या. नव्याने रूजू झालेले पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी ही प्रक्रिया पुन्हा गतीमान केली आहे. बदलीपात्र अंमलदारांना गुरूवारी सकाळी 7:30 वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक अंमलदाराची भूमिका जाणून घेऊन तसेच त्यांच्या पसंतीच्या ठिकाणांचा विचार करून बदल्या करण्यात येणार असल्याचे समजते.

या प्रक्रियेत पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावरील अंमलदारांचा समावेश आहे. एका पोलीस ठाण्यात पाच वर्षे सेवा पूर्ण केलेले, एका तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 12 वर्षांचा कालावधी पूर्ण केलेले तसेच विविध शाखांमध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक सेवा बजावलेले अंमलदार बदलीस पात्र ठरले आहेत.

40 पोलिसांना पदोन्नती
दरम्यान, जिल्हा पोलीस दलातील काही पोलिसांना पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी 20 पोलीस नाईकांना पोलीस हवालदारपदी तर 20 पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक (सहायक फौजदार) पदावर पदोन्नती देण्याचे आदेश काढले आहेत. पदोन्नती मिळालेल्या पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आठ दिवसांत अधिकार्‍यांच्या बदल्या
राज्याचे पोलीस महासंचालकांनी मागील आठवड्यात पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडूनही परिक्षेत्रातील बदल्यांची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसांमध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले पोलीस ठाण्याचे प्रभारी तसेच वादग्रस्त ठरत असलेल्या प्रभारी अधिकार्‍यांचीही उचलबांगडी केली जाणार आहे. दरम्यान, अधिकार्‍यांकडून इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळविण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : मालेगावात आठवडे बाजारातील भेळभत्यातून १४० जणांना विषबाधा; मंत्री...

0
नाशिक | Nashik जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील (Malegaon Taluka) नांदगाव बुद्रुक येथे आठवडे बाजारात विक्रीस असलेल्या भेळ भत्त्यातून तब्बल १४० जणांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची खळबळजनक...