अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरात भविष्य सांगण्याच्या बहाण्याने वृध्द व्यक्तींची फसवणूक करण्यात आल्याच्या लागोपाट दोन घटना घडल्या होत्या. या प्रकारची फसवणूक करणार्या दोन चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
संतोष चंद्रसेन गायकवाड (वय 68, रा. केडगाव) हे 28 मार्च रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बसलेले असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याशी संवाद साधला. तुमचे भविष्य सांगतो असे सांगत त्यांनी गायकवाड यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून ती 20 रूपयांच्या नोटेत गुंडाळून शर्टाच्या खिशात ठेवल्याचे भासवले. मात्र प्रत्यक्षात अंगठी खिशात न ठेवता ती स्वतःजवळ ठेवून चोरट्यांनी फसवणूक केली. याच दिवशी दुसरी घटना सावेडी येथील अरूण सहादु निंबाळकर (वय 74) यांच्या बाबतीत घडली. ते पुणे एसटी बस स्थानकावर पाथर्डी बसची वाट पाहत असताना चोरट्यांनी त्यांच्याशीही अशाच पध्दतीने संवाद साधून विश्वास संपादन केला. त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून 20 रूपयांच्या नोटेत गुंडाळून पिशवीत ठेवल्याचे भासवून ती लंपास केली.
दोन्ही प्रकरणांचा तपास कोतवाली पोलिसांकडून सुरू होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सखोल चौकशीच्या आधारे संशयितांचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संशयितांनी आपली नावे लुकमान सुलेमान मदारी (वय 24) व अल्ताफ हसेन कुरेशी (वय 26) अशी सांगितली. ते मूळचे शिरूर (जि. पुणे) येथील असून सध्या पारनेर तालुक्यातील निघोज येथे वास्तव्यास असल्याचे उघड झाले. पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून सुमारे 1 लाख 20 हजार रूपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (7 ग्रॅम व 5 ग्रॅम) जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाटील, अंमलदार रोहिणी दरंदले, राहुल शिंदे, दौंड, दीपक रोहकले, सत्यम शिंदे, सुरज कदम, सचिन लोळगे, राम हंडाळ, राहुल गुंड्डू यांच्या पथकाने केली.




