Sunday, September 8, 2024
HomeUncategorizedतबल्याचा नाद आणि व्हायोलिनच्या लहरी... - कमलाकर जोशी

तबल्याचा नाद आणि व्हायोलिनच्या लहरी… – कमलाकर जोशी

उस्ताद झाकिर हुसेन यांच्यामुळे तबल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन ओळख, लोकप्रियता लाभली. सर्वसामान्य रसिकही तबल्याची जुगलबंदी एन्जॉय करु लागले. असे असले तरी तबला व अन्य वाद्य संगीताला फार जुनी व मोठी परंपरा लाभली आहे. संगीतात मानवी मनाला, मानवी जीवनाला नवसंजीवनी प्राप्त करुन देण्याची ताकद आहे. वाद्य संगीतातही तीच ताकद आहे. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगात जी गाणी अजरामर झाली, त्या गीतांना लोकप्रिय करण्यामध्ये नानाविध वाद्यांचा, ती वाद्य अत्यंत सुरेखपणे वाजवणार्‍या, हाताळणार्‍या, त्यांचा सुंदर मेळ साधणार्‍या वादकांचा मोलाचा वाटा आहे…काही वाद्ये जाणून घेण्याचा हा प्रयत्न…

तबला हा फारसी भाषेतला शब्द आहे. हिंदुस्थानी म्हणजे उत्तर भारतीय संगीतात साथसंगतीसाठी व स्वतंत्र वादनासाठी वापरल्या जाणार्‍या एका तालवाद्याची जोडी म्हणजे तबला. उर्ध्वमुखी म्हणजेच वर तोंड असलेल्या अनेक अवनद्ध वाद्यांचा भारतात प्रचार व प्रसार होता. मृदुंंग व पखवांज ही आडवी ठेऊन वाजविण्याची वाद्ये आहेत. भारतीय ताल वाद्यातले आज जागतिक स्तरावर लोकप्रिय झालेले तबला हे वाद्य प्राचीन आहे. 1730 ते 40 च्या आसपास दिल्लीतील सिद्धारखाँ धाडी या उर्ध्वमुखी वादकांचे आकर्षण होते. उभ्या वाद्यावर हाताच्या पंजापेक्षा बोटांनी आघात करणे जास्त सोपे जाते. त्यामुळे बोटांची चपळ हालचाल करून वेगवान जादा निर्मिती करता येते हे त्यांनी जाणले.

- Advertisement -

धृपदाच्या मानाने काहीसा नाजूक गायकीचा प्रकार त्याला साथसंगतीला पखवाजचा धीरगंभीर नाद असण्यापेक्षा हलका फुलका तबल्याचा नाद हा जास्त संयुक्तिक वाटतो. याच काळात लाला भवानीदास नावाचे एक पखवाज वादक तबल्याच्या मोहात पडले. पखवाजावर वाजते ते या उर्ध्वमुखीवर वाजवण्याचा प्रयोग त्यांनी आरंभला. भवानी दीन आणि सिद्धार्थ खाँ हे दोघे 1750 ते 1770 च्या काळातील तबल्याचे जनक म्हणून नावाजले गेले. पंजाब बाज हा पखवानी बाज तर दिल्ली बाज हा नाजुक-दोन बोटांनी वाजवलेला बाज म्हणून ओळखला जातो.

उजव्या हाताने वाजवितात तो तबला किंवा दायाँ व डाव्या हाताने वाजवितात तो डग्गा अथवा बायाँ. डग्ग्याचा उपयोग खर्ज ध्वनी काढण्यासाठी तर तबल्याचा उच्च ध्वनी काढण्यासाठी करतात.

तबला ह्या वाद्याचे मूळ तब्ल या अरबी वाद्यात असावे. इब्न खुर्दाद बिह या इतिहासकाराच्या मते तब्लच्या निर्मितीचा मान तबल् बी लमक या अरबी कलावंताकडे जातो. हे वाद्य मोगलांकरवी भारतात आले. 1296 ते 1316 च्या दरम्यान तबल्यात महत्त्वाच्या सुधारणा होऊन ख्याल व टप्प्यासारख्या संगीतरचनांबरोबर त्याचा साथीसाठी वापर होऊ लागला. मृदंग-पखावजाप्रमाणे उपयोगात आणलेली शाई ही महत्त्वाची सुधारणा. ह्याचे श्रेय बहुमताने अमीर खुसरौस (1253-1325) दिले जाते.

तबला खैर, शिसव, बाभूळ, चिंच इत्यादींच्या लाकडाचा बनविलेला असून तो वरील तोंडाकडे किंचित निमूळता, नळकांड्याच्या आकाराचा व आतून पोखरून काढलेला असतो. डग्गा तांब्याचा, पितळेचा किंवा क्वचित मातीचा असून घुमटाकृती असतो. डग्ग्याचा रुंद व तबल्याच्या निरुंद तोंडावर बकर्‍याचे चामडे ताणून बसविलेले असते. हे चामडे, त्याभोवतालची दुहेरी किनार (चाट), वर बसविलेली वादीची विणलेली कडा (गजरा) या सर्वांना मिळून पुडी म्हणतात. नादमाधुर्यासाठी तबल्याच्या पुडीच्या मध्यावर व डग्ग्याच्या पुडीवर मध्याच्या जरा बाजूस शाई (लोखंडाचा कीस, काळी शाई व भात यांचे मिश्रण) घोटून वर्तुळाकार थर देतात. पुडीमधून ओवलेली वादी तळाच्या चामडी कड्यातून (पेंदी मधून) तोंडाभोवती ओढून घेतात. तबल्याच्या वादीतील लाकडी गठ्ठे खालीवर ठोकून गायन-वादनाच्या आधारस्वराशी त्याचा स्वर जुळवितात.

वादनवैशिष्ट्यांनुसार तबल्याची विविध घराणी निश्चित झाली आहेत. दिल्ली हे आद्य घराणे. बंद बाज व खुला बाज या या घराण्याच्या मूळ संकल्पना होत. बंद बाज वा चाँटी का बाज या प्रकारात चाटेवरील व शाईवरील आघात स्वतंत्र बोटांनी करतात. दिल्ली, अजराडा, बनारसफही या प्रकारातील घराणी होत. खुला बाज अथवा पूरब बाज (दिल्लीच्या पूर्वेकडील घराणी) या प्रकारात चाट व शाई यांच्या मधील भागावर पंज्यांनी अथवा बोटे जुळवून आघात केला जातो. त्यावर पखावजाच्या वादनपद्धतीची छाप दिसते. जोरकसपणा हे वैशिष्ट्य, लखनौ, फरूखाबाद, मेरठ, व पंजाब ही या प्रकारातील घराणी होत.

दिल्ली घराण्याचे उस्ताद नथ्थूखाँ, गामेखाँ, अजराड्याचे उस्ताद हबीब उद्दिनखाँ, लखनौचे वाजिद हुसेनखाँ, फरूखाबादचे उस्ताद मुनीरखाँ, र्‍अहमदजान थिरकवा, अमीर हुसेनखाँ, बनारसचे पंडित राम सहाय, बिरू मिश्र, पं. सामताप्रसाद मिश्र, पंजाबचे उस्ताद कादिर बक्ष असे काही प्रसिद्ध तबलावादक होत.

लयप्रधान गायकी, वादन व कथ्थकसारखी नृत्ये याच तबल्याच्या साथीने रंगतात.

व्हायोलिन – हे पाश्चिमात्य वाद्य आहे. या वाद्याची उत्क्रांती युरोप व इटलीत झाली. इटालियन व्हायोलिन्स हे जगातील सवर्ोंत्कृष्ट व्हायोलिन्स मानली जातात. इटलीतील क्रिमोनागाव्ह बी व्हायोलिनची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. 1750 ते 1800 या काळात सर्वोत्कृष्ट वाद्य पाश्चात्य संगीतातील सम्राज्ञी म्हणून बनून राहिली आहे. व्हायोलिन इंग्रजांकडून स्वीकारल्यानंतर पहिले जर काही केले तर बाळू स्वामी यांनी पहिले भारतीय संगीत वाजवले. मुथ्थुस्वामी दि सितार यांचे शिष्य वेदू वळू स्वामी यांनी कर्नाटक संगीतात हे वाद्य साथीला आणले. त्यामुळे वीणा हे वाद्य मागे पडून व्हायोलिन हे वाद्य प्रचलित झाले. व्हायोलिनमधील धीरगंभीरता, सहजता वेगळीच अनुभूती देत असते. अथांग समुद्राच्या बेधुंद लाटांवर स्वार झाल्याचा फील व्हायोलिन तुम्हाला देते. तुम्हाला वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याची ताकद तबला व व्हायोलिन या दोनही वाद्यांत आहे ( तशी ती सर्वच वाद्यांत अांहे.) ऐकतच राहावे…देहभान विसरावे इतपती ही वाद्ये

– कमलाकर जोशी

(संदर्भासाठी काही माहिती आंतरजालावरुन साभार)

- Advertisment -

ताज्या बातम्या