Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedमाझ्या मराठी मातीचा...लावा ललाटास टिळा... - राजेंद्र उगले

माझ्या मराठी मातीचा…लावा ललाटास टिळा… – राजेंद्र उगले

इ.स. 10 व्या शतकापासून मराठीचा विकास अधिक गतीने झाला. कारण या काळात या भाषेला मिळालेला राजाश्रय व विविध धार्मिक संप्रदाय, संतपरंपरा. देवगिरीच्या दोन्ही यादवांनी आपल्या दरबारात मराठीचा उपयोग केला. मराठीतून महानुभाव व वारकरी हे दोन धार्मिक संप्रदाय निर्माण झाले. या दोन्ही संप्रदायांनी आपल्या भक्तिसंप्रदायाच्या प्रचाराचे मराठी हे माध्यम मानले. ज्ञानेश्वर, मुक्ताई, तुकाराम, एकनाथ, नामदेव, चोखामेळा, संत सेना, नरहरी इत्यादी संतपरंपरेने अभंगरचना करून मराठी जनमानसात रुजवली. शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रघुनाथपंत हनुमंते यांच्याकडून राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला व राज्यकारभारात मराठीला स्थान दिले….

मराठीला आपण मायबोली म्हणतो. यातील बोली हा शब्द भाषावाचक आहे पण माय हा त्याहून अधिक मोलाचा शब्द आहे. माय म्हणजे आई. आईला आपली सगळीच लेकरं सारखी. सगळ्यांवर तिचं सारखंच प्रेम. तसे मायमराठीनेही आपली सारी लेकरे एकाच मायेने आपल्या पोटाशी धरली आहेत. ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात…

- Advertisement -

तीर्थामध्ये काशी । व्रतांमध्ये एकादशी ! भाषांमध्ये तशी । मराठी शोभिवंत ॥

ऐसी मराठी सुंदरी । ते संस्कृता शोधु करी

शटिक बैसवी हृदयमंदिरी । अज्ञानाची ॥

अशी ही माझी मायमराठी भाषा आज जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा मानली जाते. या मराठी भाषेचा जन्म नेमका केव्हा झाला याबाबत मकृष्णाजी पांडुरंग कुलकर्णीफ यांचा मराठी भाषा : उदगम व विकास (1933) हा ग्रंथ अतिशय मोलाचा समजला जातो. या ग्रंथात ते म्हणतात, सर्व प्राकृत भाषा अपभ्रंश व संस्कृत या भाषांनी आपल्या परीने मराठीत जन्माला आणण्यास हातभार लावलेला दिसतो. निरनिराळ्या प्राकृत भाषा बोलणारे निरनिराळे समाज हे निरनिराळ्या काळी अनेक कारणांमुळे आर्यावर्तातून महाराष्ट्रात उतरले आणि तेथेच स्थायिक झाले. त्यांच्या संमिश्र बोलण्याने मराठी भाषा बनली. महाराष्ट्र देश ज्याप्रमाणे गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, अश्मक, कुंतल, विदर्भ, कोकण इत्यादी लहान-मोठ्या प्रदेशांचा बनला आहे. व महाराष्ट्राची लोकवसाहत ज्याप्रमाणे निरनिराळ्या लोकघटकांनी मिळून झाली. त्याचप्रमाणे मराठी भाषा ही निरनिराळ्या प्राकृत भाषांच्या विशेषतः महाराष्ट्री, अपभ्रंश यांच्या मिश्रणाने बनली. या रीतीने विचार केला तर ख्रिस्तोत्तर 600 ते 700च्या सुमारास मराठी भाषेचा उगम झाला; असे म्हणावे लागते. त्यावरून आपल्या मराठी भाषेचे आजचे वयोमान हे तेराशे ते चौदाशे वर्ष मानावे लागेल.

मराठी भाषा : उगम आणि शोध यासाठी डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे प्राचीन महाराष्ट्र-खंड 1 व 2, स.आ.जोगळेकर यांनी संपादित केलेला हाल, सातवाहनाची गाथा सप्तशती, गुणाढ्याचे बृहत्कथा तसेच राजारामशास्त्री भागवत, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, वि. का. राजवाडे, वि.ल. भावे, रा. भि. जोशी आदींच्या ग्रंथांचा आधार घेतला तर मराठीचे मूळ आणखी खोलवर रुजलेले दिसते.

राजारामशास्त्री भागवत यांचे निवडक साहित्य दुर्गा भागवत यांनी संपादित केले असून त्याचा पहिला खंड मर्‍हाट्या संबंधाने चार उद्गार या विषयावर महत्त्वाचा प्रकाशझोत टाकतो. राजारामशास्त्री भागवत म्हणतात, महाराष्ट्र हा शब्द बराच जुनाट आहे. म्हणजे शालिवाहन शतकाच्या पूर्वी सुमारे सव्वाचारशे वर्ष वररुची नावाचा विद्वान झाला. त्याने प्राकृत प्रकाश नावाचे प्राकृत भाषेचे म्हणजे, संस्कृत नाटकातील बालभाषेचे व्याकरण केले आहे. या व्याकरणाचे अगदी शेवटचे सूत्र आहे शेष महाराष्ट्रीवत.

वररुचीची महाराष्ट्री ही बुद्धपूर्व आहे आणि आणि वररुचीचे व्याकरण पाली किंवा अर्धमागधी या भाषांच्या उदयापूर्वीचे आहे. वरच्या काळापूर्वी काही पिढ्या पैशाची ही वाङ्मयाची भाषा होती व त्या काळात महाराष्ट्री प्रगल्भ झाली होती. सर्व प्राकृत भाषांत तीच प्रमुख भाषा होती. या प्रगल्भतेचा कालावधी अर्थातच वररुचीच्या पूर्वी दोनशे ते तीनशे वर्षे इतका तरी होता. त्यावरून प्राकृत प्रकाशाच्या उत्पत्तीच्या काळी प्राकृत भाषेचे व्याकरण असणे आणि त्यात महाराष्ट्र हा शब्द अस्तित्वात असणे हे पूर्ण संभवनीय वाटते.

महाराष्ट्री भाषेबद्दल भाष्य करताना कात्यायन म्हणतो की, शौरसेनी भाषेची एक प्रकृती जशी संस्कृत तशीच दुसरी प्रकृती महाराष्ट्री उर्फ अतिप्राचीन मर्‍हाटी. शौरसेनीपासून मागधी व पैशाची नावाच्या बालभाषा निघाल्या. यावरून सर्वच बालभाषांचे मूळ प्राचीन मर्‍हाटी असा सिद्धांत केल्यास हरकत नसावी. सर्व प्रकृती व गाणी ज्या भाषेत होती, अशी एक प्राचीन भाषा म्हणजे मर्‍हाठी भाषा होय. या बालभाषांसाठी मूळ शब्द पाअड भाषा. म्हणजे सर्व लोकांचे व्यवहार व दळणवळण ज्या भाषेत चालते ती भाषा. संस्कृत भाषा ही धर्म प्रसाराची भाषा होती. काही काळाने संस्कृत शब्दाशी मेळ दिसावा म्हणून पाअड शब्दाचे प्रकट रूप न करता प्राकृत असे रूपांतर केलेले दिसते. यावरून महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी व पैशाची या सर्व भाषा प्राकृत झाल्या व या प्राकृत भाषांचे प्राकृत प्रकाशा नावाचे सूत्रमय व्याकरण कात्यायनाने प्रथम लिहिले. महाराष्ट्री भाषेतून निघाली शौरसेनी व शौरसेनेपासून मागधी व पैशाची. यावरून शौरसेनेची खरी आई म्हणजे प्राचीन मराठी. मराठी भाषेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी प्राचीन मराठीतील (1) गाथासप्तशती, (2) प्रवरसेनाचे सेतुकाव्य, (3) गौडवध, (4) राजशेखर यांची कर्पूरमंजिरी हे ग्रंथ मार्गदर्शक ठरतात.

इरावती कर्वे यांचा ममराठी लोकांची संस्कृतीफ हा ग्रंथ मराठी भाषा संशोधकांसाठी फार महत्त्वाचा मानावा लागेल. यात त्या म्हणतात, पश्चिमेकडील शक व महाराष्ट्रातील सातवाहन येण्याच्या आधी महाराष्ट्र भूमीत संस्कृत व संस्कृतोद्भव भाषा दृढमूल झाली होती. म्हणून बाहेरून आलेल्या राजांनी द्रविडी भाषा न उचलता महाराष्ट्री आत्मसात केली. महाराष्ट्राचे राजे सातवाहन यांनी प्रतिष्ठान ऊर्फ पैठण येथे राज्य केले व त्यांनी प्राकृत भाषेला उत्तेजन दिले. पर्यायाने मराठीच्या जन्माला मदतच केली.

प्राकृत देशी भाषांमध्ये महाराष्ट्री प्राकृतचा समावेश होत असून ही मुळात वैदिक संस्कृतपासून उत्पन्न झाली, असे काहींचे म्हणणे आहे. महाराष्ट्रीचे अपभ्रंश रूप मराठी आहे. तिच्यावर पर्शियन, अरेबिक, उर्दू व हिंदीचा प्रभाव आहे. मराठी प्राकृत सामान्यतः इसवी सन 875पासून बोलली जात होती व ती सातवाहन साम्राज्याची राजभाषा होती. मराठी भाषेबद्दल लेखी रूपातील पुरावे व ऐतिहासिक साक्षीपुरावे पाहता मराठी ही सातव्या शतकातील ठरते. कारण मराठीचा पहिला दस्तऐवज इ.स.700चा असून तो कर्नाटकात आढळून आला आहे. अगदी प्रारंभीचा लेखी नमुना विजयादित्याच्या सातारा येथे सापडलेल्या ताम्रपटावर असून तो सुमारे 739 सनाचा आहे. इ.स. 983च्या शिलालेखात एक पुरावा आहे, तो दक्षिण कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराच्या पायथ्याशी आहे. त्यावर मश्री चामुंडाराये करविले, श्रीगंगाराजे सुत्ताले करविलेअसा उल्लेख आहे.

इ.स. 10व्या शतकापासून मराठीचा विकास अधिक गतीने झाला. कारण या काळात या भाषेला मिळालेला राजाश्रय व विविध धार्मिक संप्रदाय, संतपरंपरा. देवगिरीच्या दोन्ही यादवांनी आपल्या दरबारात मराठीचा उपयोग केला. मराठीतून महानुभाव व वारकरी हे दोन धार्मिक संप्रदाय निर्माण झाले. या दोन्ही संप्रदायांनी आपल्या भक्तिसंप्रदायाच्या प्रचाराचे मराठी हे माध्यम मानले. शेवटच्या म्हणजे तिसर्‍या यादवापर्यंत नलोपाख्यान, रुक्मिणी स्वयंवर तसेच श्रीपतीची ज्योतिर्ररत्नमाला यांसारखे उत्तम वाङ्मय तयार झाले. इ.स. 1188मध्ये मुकुंदराज यांनी 1663 ओव्या असलेला विवेकसिंधु हा मौलिक ग्रंथ लिहिला. त्यांनीच वेदांताचे निरूपण करणारा परमामृत लिहिला. 1275 ते 1296 या कालावधीत संत ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी व अमृतानुभव लिहिले. ज्ञानेश्वर, मुक्ताई, तुकाराम, एकनाथ, नामदेव, चोखामेळा, संत सेना, नरहरी इत्यादी संतपरंपरेने अभंगरचना करून मराठी जनमानसात रुजवली.

महानुभाव संप्रदायातील चक्रधर स्वामींनी लीळाचरित्र हे मराठीतील गद्य सांगितले व त्यांचा जवळचा शिष्य माहिंभट्ट यांनी ते संकलित केले. महदंबा या मराठीतील पहिल्या कवयित्रीने धवळे हा काव्यप्रकार हाताळला. वारकरी संप्रदायात संत एकनाथांनी भागवत धर्माचा संदेश देण्यासाठी भावार्थ रामायण लिहिले. मुक्तेश्वराने महाभारताचा मराठीत अनुवाद केला. फादर थॉमस स्टीफन्स यांनी ख्रिस्तपुराण प्रथम पोर्तुगीज भाषेत लिहिले व नंतर त्याचे मराठी भाषांतर करून रोमन लिपीत छापले. संत तुकारामांनी मराठीतून तीन हजारांच्यावर अभंगरचना केल्या. त्यानंतर समर्थ रामदासांनी दासबोधची रचना केली.

शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रघुनाथपंत हनुमंते यांच्याकडून राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला व राज्यकारभारात मराठीला स्थान दिले. मराठी अधिक वाढीस लागली. उत्तरावर्ती राज्यकर्त्यांनी मराठा साम्राज्य उत्तरेत दिल्लीपर्यंत, पूर्वेस ओरिसापर्यंत तर दक्षिणेत तामिळनाडूच्या तंजावरपर्यंत पसरवले. त्याचा परिणाम मराठीचा या प्रांतात प्रसार होण्यास मदत झाली. सतराव्या शतकातच अगिनदास यांनी लिहिलेला अफजलखानाचा पोवाडा हा सर्वात जुना पोवाडा मानला जातो. या कालावधीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी बखर लिहिली. जमिनीचे व्यवहार व व्यापारात मराठीचा वापर सुरू झाला. मराठीने उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या फारशी भाषेची जागा घेतली.

18 व्या शतकात अनेक सुप्रसिद्ध रचना झाल्या. शाहीर अनंत फंदी यांनी अनेक पदे, लावण्या, कटाव, फटके यांची रचना केली. कृष्णाजी शामराव यांची भाऊसाहेबांची बखर, वामन पंडित यांचा यथार्थ दीपिका, राजा भुजंग यांचे वेणूसुधा, सरिता स्वयंवर, रघुनाथ पंडित यांचे नलदमयंती स्वयंवर, श्रीधर पंडित यांचे पांडवप्रताप, हरिविजय, रामविजय, मोरोपंतांची आर्यारचनेतील महाभारत, केकावली. अठराव्या शतकात नवीन साहित्यप्रकार यशस्वीपणे हाताळण्यात आले व अभिजात शैली विकसित करण्यात आली. ब्रिटिश वसाहतींच्या कालावधीत डॉ. विल्यम कॅरी नावाच्या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या प्रयत्नांनी मराठी व्याकरणाचे प्रमाणीकरण करण्यात आले. त्यांना पंडित वैजनाथ नागपूरकर यांनी मदत केली. 1778 मध्ये डॉ. ग्रीयर्सनाने मराठीच्या व्याकरणावर पुस्तक लिहिले.

19 वे शतक हे इंग्रजीचे शिक्षण घेतलेल्या बुद्धिवंतांचे शतक होते. या काळात गद्य व तर्क लेखनाला उत्तेजन मिळाले. 1880 मध्ये गणपत रघुनाथ नवलकर यांचे द स्टुडन्ट मराठी ग्रामर, 1895 मध्ये आप्पाजी काशिनाथ खेर यांचे हायर मराठी ग्रामर तर त्यानंतर रामचंद्र भिकाजी जोशी यांचे अ कम्प्रेहेनसिव्ह मराठी ग्रामरफ अशी व्याकरणावरील पुस्तके निघाली. कृष्णाजी चिपळूणकर यांनी दादोबांच्या व्याकरणावर शतपत्रकात 20 ते 25 निबंध लिहिले. ते मराठी व्याकरणावरील निबंध म्हणून प्रसिद्ध आहेत. रा. भि. जोशी यांनी सुबोध व्याकरण लिहिले. आगरकरांनी वाक्यमीमांसा केली. इतिहासाचार्य राजवाडे यांनी ज्ञानेश्वरीतील मराठी व्याकरण लिहिले. 1922-23 च्या सुमारास जॉर्जि जर्विस यांच्या नेतृत्वाखाली जगन्नाथशास्त्री क्रमवंत, रामचंद्रशास्त्री, गंगाधरशास्त्री फडके व बाळशास्त्री घगवे यांनी मराठी भाषेचे व्याकरण प्रश्नोत्तर रूपात सरकारी शाळा पुस्तक समितीच्या आदेशावरून लिहिले. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण लिहिले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. एकूणच मराठी भाषेच्या आजच्या समृद्धीसाठी ह्या व्याकरण ग्रंथांचा कालावधी फार उपयुक्त ठरला. त्यांनी मराठी भाषेला प्रमाणभाषा म्हणून रूजविण्यासाठी मोलाची भर घातली.

1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वर्तमानपत्र दर्पण सुरू केले. 1840 मध्ये दीर्घदर्शन नावाने पहिले मराठी नियतकालिक प्रकाशित करण्यात आले. श्री कृ.चि.रानडे यांनी ज्ञानप्रकाश हे साप्ताहिक सुरू केले. हे साल होते 1849. त्यानंतर कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी 1852 मध्ये विचारलहरी हे साप्ताहिक सुरू केले. लोकहितवादी व न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रेरणेने इंदुप्रकाश वृत्तपत्र सुरू झाले. याच काळात प्रथम संगीत नाटके उत्क्रांत झाली. 1867 मध्ये ऑथेल्लो व 1875 मध्ये टेम्पेस्ट या इंग्रजी नाटकांची भाषांतरे झाली. तर 1862मध्ये वि.ज.कीर्तने यांनी लिहिलेले मथोरले माधवराव पेशवेफ या नाटकास पहिली स्वतंत्र नाट्यकृती मानले जाते. बाबा पदमजी यांची यमुनापर्यटन ही पहिली मराठी कादंबरी. त्यानंतर बर्‍याच कादंबर्‍या मराठीत अनुवादित झाल्या.

20 व्या शतकात मराठीने खूप चांगली भरारी घेण्यास सुरुवात केली. मराठीच्या संवर्धनासाठी अनेक साहित्यिकांनी मोलाची भर घातली. यात नाटक, संगीत व चित्रपट या वाङ्मयाने मोठी भूमिका बजावली. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांची पहिली कविता 1885मध्ये प्रकाशित झाली. बालकवी, गोविंदाग्रज, भा.रा.तांबे, ना. वा. टिळक, कुसुमाग्रज तसेच रविकिरण मंडळातील कवी यांसारख्या कविवर्यांनी काव्यप्रांतात मोलाची भर घातली. चिपळूणकरांच्या निबंधमाला, न. चिं. केळकर यांचे आत्मचरित्र लेखन, हरि नारायण आपटे, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर यांच्या कादंबर्‍या, किर्लोस्कर-गडकरींची नाटके अशा विविध रूपाने मराठी विकसित झाली. आचार्य अत्रे यांच्या बहुपैलू रचनांनी तो काळ गाजवला.

भारतीय संशोधकांनी मराठीच्या 42 बोलीभाषांचा शोध लावला. प्रमाण मराठी बोलीभाषेपासून या बोलीभाषा उच्चारण्याच्या व रचनेच्या दृष्टीने भिन्न असल्या तरी त्यांचे मूळ मराठीत होते. त्यांची विभागणी प्रामुख्याने झडी/ झाडीबोली, वर्‍हाडी बोली, अहिराणी, खानदेशी, कोकणी, वडवली, सामवेदी, तंजावर, नामदेव मराठी अशी करण्यात आली. मराठी भाषेतून लिहिलेल्या ग्रंथांना आजवर चार वेळा ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. यात वि. स. खांडेकर, वि.वा.शिरवाडकर, विंदा करंदीकर , भालचंद्र नेमाडे या दिग्गज साहित्यिकांचा समावेश आहे. हा पुरस्कार म्हणजे मराठी भाषेचा सर्वोच्च सन्मानच आहे. आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. मोबाईल हातात घेऊन जगाशी संवाद साधणार्‍या तरुण पिढीचा हा कालखंड आहे. मराठी भाषा ही दर कोसाला बदलते, असे आपण एकीकडे म्हणत असताना ही नवी पिढी संगणक आणि मोबाईलच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे. एसएमएस, ट्विटर, ऑर्कुट, फेसबुक, व्हाट्सऍप, ब्लॉग यांच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी ही पिढी मोठ्या प्रमाणात मराठीचा वापर करताना दिसते आहे. युनिकोड या फॉन्टमुळे संगणकावरील मराठीचे अस्तित्व अधिक ठळक होण्यास मदत झाली आहे. विकिपीडियासारख्या इंटरनेट माहिती कोशानेदेखील मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मराठीतील अनेक संकेतस्थळे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. आज मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या माध्यमातून जागतिक भाषा बनविण्याचे आव्हान आपल्याला पेलायचे आहे. त्यासाठी तर कविवर्य कुसुमाग्रज यांचे

माझ्या मराठी मातीचा

लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या

दर्‍याखोर्‍यातील शिळा…

हे स्फूर्तिगान आपल्याला नसानसात भरून घ्यावे लागेल लागेल.

– राजेंद्र उगले, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या