धाराशिव | Dharashiv
दिवाळीच्या आनंदावर धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात भीषण दुर्घटनेने विरजण घातले आहे. किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या करंडे कुटुंबाच्या घराला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक व्यक्ती बचावली आहे. घरात सर्वजण झोपेत असताना आग लागल्याने धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांमुळे त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या घटनेमुळे येडशी गावासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मध्यरात्री अडीचच्या सुमारास आगीचा भडका
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे गोविंद करंडे यांचे किराणा दुकान आणि त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर त्यांचे कुटुंब वास्तव्यास होते. सोमवारी (९ नोव्हेंबर) मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास या इमारतीला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. तळमजल्यावरील दुकानातील किराणा साहित्य आणि इतर वस्तूंमुळे आग वेगाने पसरल्याची प्राथमिक माहिती आहे. घरातील सदस्य गाढ झोपेत असल्याने आग लागल्याचे लक्षात येईपर्यंत परिस्थिती गंभीर झाली होती. आगीचे लोट आणि धुरामुळे वरच्या मजल्यावरील कुटुंबाला बाहेर पडणे कठीण झाले ज्यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला.
संपादकीय : ९ नोव्हेंबर २०२६ – पारदर्शक परीक्षा प्रक्रियेची नवी दिशा
एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत
या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये उत्तम त्रिंबक करंडे, चंद्रकला उत्तम करंडे, गोविंद उत्तम करंडे, ज्योती गोविंद करंडे, गायत्री गोविंद करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोघांचा होरपळून, तर चौघांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. कुटुंबातील एक व्यक्ती या दुर्घटनेतून बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. धाराशिव, कळंब आणि तुळजापूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी तसेच घरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता आणि धुराचे प्रमाण अधिक असल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या.
येडशी गावावर शोककळा; बाजारपेठ बंद
दिवाळीच्या सणात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने येडशी गावात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गावातील व्यापाऱ्यांनी दुःख व्यक्त करण्यासाठी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सहाही मृतांवर सोमवारी दुपारी दोन वाजता येडशी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळीच्या प्रकाशोत्सवाच्या रात्री एका कुटुंबावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण परिसर शोकात बुडाला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी आगीच्या घटना
लक्ष्मीपूजनाच्या रात्री ठाणे, मुंबई आणि भिवंडी परिसरात आगीच्या अनेक गंभीर घटना समोर आल्या आहेत. ठाण्यातील पॉश रहेजा गार्डन संकुलातील १७ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीने खळबळ उडवून दिली.
वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डन संकुलातील ‘कार्लाइल’ या १७ मजली इमारतीला रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ८ व्या मजल्यावर भीषण आग लागली. ही भीषण आग 14 व्या मजल्यापर्यंत पसरली. अग्निशमन दलाच्या १० ते १५ गाड्यांनी ६ तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. ५० हून अधिक रहिवाशांसह पाळीव प्राण्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
डोंगरी : डॉ. महेश्वरी रोडवरील हाजी कासम चाळीजवळील गॅरेजला रात्री १० च्या सुमारास लागलेल्या आगीत १० ते १२ दुकाने जळून खाक झाली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून लगतच्या ३ इमारती रिकाम्या करण्यात आल्या होत्या.




